नाशिक : तरुणाचा निर्घृण खून करून मृतदेह फेकला नदीत | पुढारी

नाशिक : तरुणाचा निर्घृण खून करून मृतदेह फेकला नदीत

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
दाभाडी गावातील तरुणाचा निर्घृण खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह बोरी नदीपात्रात फेकून देण्यात आले. शनिवारी (दि.21) रात्री ही घटना घडली. दुसर्‍या दिवशी हा प्रकार निदर्शनास आला. प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. मात्र, नंतर अज्ञाताविरोधात वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पंकज सुभाष मानकर (24, रा. दाभाडी) असे मृताचे नाव आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मानकर हा वाहनचालक होता. कोणते तरी भाडे सोडण्यासाठी तो शनिवारी दुपारी घराबाहेर गेला होता. नंतर परतलाच नाही. रविवारी (दि. 22) सकाळी 11च्या सुमारास गरबड गावातील पळाशी शिवारात बोरी नदीपात्रालगत बेवारस मृतदेह मिळून आला. पोलिसपाटील संतोष भागरे यांनी पोलिसांना खबर दिली. बेपत्ता व्यक्तीचा शोध घेताना अंकुश सुरेश मानकर (33) यांनी मृतदेहाची पाहणी केली असता, तो पंकजचा असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळापासून काही अंतरावर त्याचे वाहन उभे होते.

अत्यंत अमानुषपणे मारहाण करीत पंकजचा खून करण्यात आल्याचे सांगण्यात येते. हातपाय मोडण्यात आले. छातीवरही मारहाण झाली. डोक्यालाही गंभीर इजा करून प्रेत बोरी नदीपात्रालगत टाकून देण्यात आले. एकाहून अधिक जणांनी ही हत्या केली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. याप्रकरणी अज्ञातांविरोधात खून व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न असा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी तपासाची चक्रे फिरविली असून, सहायक पोलिस निरीक्षक शिंदे अधिक तपास करीत आहेत. पंकजवर रविवारी (दि.22) रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.

हेही वाचा :

Back to top button