सांगली : अलमट्टीसह राज्यातील धरणांत जादा पाणीसाठा! | पुढारी

सांगली : अलमट्टीसह राज्यातील धरणांत जादा पाणीसाठा!

सांगली ; सुनील कदम : पश्‍चिम महाराष्ट्रातील महापुराला कारणीभूत ठरणार्‍या कर्नाटकातील अलमट्टी धरणासह राज्यातील कोयना, चांदोली, राधानगरी, दूधगंगा यांसह अन्य प्रमुख धरणांमध्ये यंदाही अवाजवी पाणीसाठा दिसून येत आहे. या धरणांमधील अतिरिक्‍त पाणीसाठा महापुराला निमंत्रण देण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रमुख धरणांमधील पाणीसाठा तातडीने कमी करण्याची आवश्यकता व्यक्‍त करण्यात येत आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातील महापुराला सर्वाधिक कोण कारणीभूत होत असेल तर ते कर्नाटकातील अलमट्टी धरण! या धरणातील बॅकवॉटरमुळे या भागात महापुराचे संकट ओढवते, हे आजपर्यंत अनेकदा स्पष्ट झाले आहे. असे असताना यंदाही अलमट्टी धरणामध्ये अतिरिक्‍त पाणीसाठा दिसून येत आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी अलमट्टीतील पाण्याची पातळी 508 मीटर आणि पाणीसाठा 23 टीएमसी होता.

यंदा ही पाणीपातळी 510.97 मीटर आणि पाणीसाठा 34.40 टीएमसी इतका आहे. म्हणजे गेल्यावर्षीपेक्षा पाणीपातळी जवळपास तीन मीटरने आणि पाणीसाठा 11-12 टीएमसी जादा आहे. अलमट्टीतील पाण्याची पातळी 516 मीटरपर्यंत गेली की महापुराचा धोका वाढायला सुरुवात होते. ही बाब आणि यंदाचे पाऊसमान विचारात घेता अलमट्टीतील विद्यमान पाणीपातळी 505 मीटरपर्यंत खाली नेऊन पाणीसाठाही 12 टीएमसीपर्यंत कमी करण्याची गरज आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातील कोयना, चांदोली, राधानगरी, दूधगंगा, तिलारी, तुळशी, धोम आणि कण्हेर या धरणांमधून होणारा विसर्गही या भागातील महापुरावर प्रभाव पाडतो. त्यामुळे या धरणांमध्येही पावसाळ्याच्या सुरुवातीला परंपरागत पद्धतीनुसार केवळ 10 टक्केच पाणीसाठा असायला हवा होता. पण आजघडीला या धरणांमध्ये 25-30 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे एकदा का पावसाळा सुरू झाला की, या धरणांमधून वाढणारा विसर्ग या भागातील महापुराला निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. धरणांमध्ये पाणी साठविण्याची एक परंपरागत अशी पद्धत आहे. 31 मेअखेर धरणांमध्ये साठवण क्षमतेच्या केवळ 10 टक्के इतकाच पाणीसाठा असायला पाहिजे.

पावसाला सुरुवात झाल्यानंतर 31 जुलैअखेर धरणांमध्ये 50 टक्के पाणीसाठा असायला हवा. त्यानंतर साधारणत: 15 ऑगस्टपर्यंत धरणामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या 75 टक्क्यांपर्यंत पाणीसाठा असायला हवा. त्यानंतर पावसाचे प्रमाण आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार धरणातून टप्प्याटप्प्याने पाणी सोडत राहायचे आणि पावसाळ्याच्या उत्तरार्धातील पाऊस, परतीचा पाऊस आणि पाणलोट क्षेत्रातील पाझराच्या पाण्यावर 15 ऑक्टोबरपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरून घ्यायचे, अशी धरणातील पाणी साठवण्याची प्रचलित पद्धत आहे. मात्र गेल्या काही वर्षांत धरणातील पाणी साठविण्याच्या या प्रचलित पद्धतीला हरताळ फासला जाताना दिसतो आहे.

आज पावसाळा तोंडावर असतानाही अलमट्टीसह पश्‍चिम महाराष्ट्रातील धरणांमध्ये भविष्यात धोकादायक ठरेल, इतका पाणीसाठा करून ठेवण्यात आलेला दिसून येत आहे. हा पाणीसाठा तातडीने कमी करण्याची गरज आहे.

 

Back to top button