श्रीगोंदा : बेलवंडीत एकाच रात्री बारा ठिकाणी चोऱ्या; लाखो रुपयांचा ऐवज लंपास | पुढारी

श्रीगोंदा : बेलवंडीत एकाच रात्री बारा ठिकाणी चोऱ्या; लाखो रुपयांचा ऐवज लंपास

श्रीगोंदा; पुढारी : बेलवंडी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या स्टँड परिसरात चोरट्यांनी एकाच रात्री बारा ठिकाणी चोऱ्या करत लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लुटला आहे. यामध्ये चोरट्यांकडून किराणा दुकान, मेडिकल व बंद घरे लक्ष्य करण्यात येऊन चोरी करण्यात आली होती. याप्रकरणी बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बेलवंडी पोलिस ठाण्यातर्गत येणाऱ्या पिंपळगाव पिसा, सुरेगाव, कोळगाव, घारगाव परिसरात चोरट्यानी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या चोरीच्या घटनांचा तपास सुरू होण्यापूर्वीच, चोरट्यानी आज शुक्रवारी (दि.२०) पहाटे दोन ते चारच्या दरम्यान या चोऱ्या केल्या. कटावणीच्या सहायाने शटर, दरवाजाचे कुलूप तोडून मुद्देमाल चोरून नेला. बारा ठिकाणी चोऱ्या झाल्या असल्या, तरी नेमका किती मुद्देमाल चोरी गेला याचा तपशील अद्याप उपलब्ध होऊ शकलेला नाही. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्याने व्यापारी वर्गाने पोलीस यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली आहे. बेलवंडी पोलिसांची निष्क्रियताच या चोऱ्याना कारणीभूत असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. दरम्यान घटनास्थळी श्वान पथक दाखल झाले असून, त्याआधारे तपासाची दिशा स्पष्ट होते का हे पाहिले जात आहे.

तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद

सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन चोरटे दिसत असून, त्यातील दोघांनी जर्किन घातल्याचे दिसत आहे. तिघांच्याही पायात चप्पल दिसत नाही, ते अनवानी असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहेत.

हेही वाचलत का?

Back to top button