“महिला पोलिसाला धक्का लागल्याचे दाखवले तर राजकारण सोडेन!” : संदीप देशपांडे | पुढारी

"महिला पोलिसाला धक्का लागल्याचे दाखवले तर राजकारण सोडेन!" : संदीप देशपांडे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : “महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्का लागल्याचे दाखवले तर मी राजकारण सोडेन,” असे स्पष्ट करत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकार सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. मशिदींवरील भोंग्यावरोधात आंदोलन केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या तावडीतून पळ काढणारे संदीप देशपांडे १६ दिवसांनी मुंबईत परतल्यानंतर पत्रकार परिषद घेवून त्यांनी राज्य सरकारवर अनेक आरोप केले.

“आमच्यावरील गुन्हा खोटा होता तरीही खोट्या गुन्ह्यासाठी पोलीस शोधत होते. मीडियामधील फूटेज वकिलांनी कोर्टात दाखवले असता कोणताही गुन्हा केला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारविरोधात बोलू नये याकरीता दबाव आणण्याचा प्रयत्न सरकार करत होते. पण आमचा कायद्यावर आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास होता. त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला,” असे देशपांडे यावेळी म्हणाले.

“माझ्याकडे एका न्यूज चॅनलचं फूटेज आहे. त्याचे स्क्रीन शॉट काढले आहेत. त्यामध्ये पोलीस अधिकाऱ्याचा महिला पोलिसाला धक्का लागला आहे. सरकारने राजकीय सूड उगवण्यासाठी पोलीस स्टेशनवर दबाव आणत गुन्हे दाखल केले असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच केंद्र सरकार सुडाचं राजकारण करते असे उद्धव ठाकरे सभेत म्हणाले, मग तुम्ही काय करताय? महिला पोलिसाला आमचा धक्का लागल्याचे एकतरी फूटेज दाखवले तर राजकारण सोडून देईन,” असे देशपांडे यांनी जाहीर केले.

हेही वाचलंत का ?

Back to top button