Purple Mango : जगातील सर्वात महाग ‘जांभळा आंबा’ माहितीय का? | पुढारी

Purple Mango : जगातील सर्वात महाग ‘जांभळा आंबा’ माहितीय का?

पुढारी ऑनलाईन डेस्क : मियाझाकी आंबा हा जगातील सर्वात महाग आंब्यांपैकी एक आहे. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात पेठेत २.७० लाख रुपये प्रति किलोग्रॅम इतक्या दराने हा जांभळा आंबा विकला गेला होता. वाढत चाललेल्या मागणीमुळे भारतातील शेतकऱ्यांनीदेखील या आंब्याचे उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे. (Purple Mango )

जांभळा आंब्याचा वापर आणि फायदे: उन्हाळा हा आंब्याचा हंगाम आहे. भारतामध्ये आंब्याच्या अनेक प्रजाती आहेत यामध्ये प्रामुख्याने बैंगनपल्ली, दसरी, हापूस, लंगडा हे व अशा अनेक आंब्यांची विविधता आहे. पौष्टिकता आणि चवीने भरलेले हे फळ आहे. त्यासोबतच चटण्या, आब्याचे पने, आंब्याचे लोणचे, आंब्याचे कारले, यांसारख्या विविध स्वादिष्ट पदार्थांमध्ये देखील या फळाचा वापर केला जातो. (Purple Mango)

पण तुम्हाला माहिती आहे का, भारतात मागणी वाढत असलेल्या आंब्यांचे जपानमध्ये सर्वात महागडे प्रकार आढळतात? जांभळा आंबा उर्फ मियाझाकी आंबा हा जपानमधील मियाझाकी शहरात लागवड केलेल्या सर्वात प्रसिद्ध फळांपैकी एक आहे. मात्र, अलीकडे भारतातही त्याचे उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे.

मियाझाकी आंबा म्हणजे काय?

मियाझाकी हा आंबाच्या विविध जातींमधील एक जात आहे. हा जगातील सर्वात महाग आंब्यांपैकी एक आहे. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये हे फळ २.७० लाख रुपये प्रति किलोग्रॅम इतक्या दराने विकला गेला होता. हा आंबा ‘तायो-नो-टोमागो’ किंवा ‘एग्ज ऑफ सनशाईन’ या नावांनी विकला जातो. त्याचा रंग पिवळा किंवा हिरवा नसतो, तो पूर्ण पिकल्यावर जांभळ्यापासून लाल होतो आणि त्याचा आकार डायनासोरच्या अंड्यांसारखा दिसतो. अहवालानुसार, या आंब्यांचे वजन साधारणत: ३५० ग्रॅमपेक्षा जास्त असते. तर या आंब्यामध्ये साखरेचे प्रमाण १५%हून अधिक आहे.

Back to top button