कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग मधील करिअर संधी | पुढारी

कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग मधील करिअर संधी

भारतीय युवकांमध्ये संगणक शिक्षणातील वाढत्या रुचीमुळे भारताचे महत्त्व जगभरात वाढत चालले आहे. कॉम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये आजघडीला भारत आघाडीवर आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही डिजिटल अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. भारताच्या बुद्धिमत्तेची जगात वाहवा होत आहे. देशातील राष्ट्रीय सकल उत्पादनात आयटी क्षेत्र आणि कॉम्प्युटर क्षेत्राचे योगदान वाढत चालले आहे. आऊटसोर्सिंगमुळे परदेशातील नोकर्‍या भारतीयांना आकर्षित करत आहेत. म्हणूनच आयटी क्षेत्र हे विद्यार्थ्यांना करिअरसाठी अतिशय महत्त्वाचे आणि आघाडीचे क्षेत्र ठरत आहे.

आयटी सेक्टरमध्ये करिअर करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्याला बारावीत गणित विषयासह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. माहिती आणि तंत्रज्ञान तसेच संगणक क्षेत्रात अन्य क्षेत्राच्या तुलनेने अधिक संधी मिळत आहे. सध्याच्या काळात संगणकांचे लहानसहान अभ्यासक्रमदेखील उपयुक्त ठरत आहेत. माहिती आणि तंत्रज्ञानांतर्गतील संगणकांची तांत्रिक माहिती आणि तंत्र हे रोजगाराची नवीन संधी उपलब्ध करून देत आहेत. माहिती आणि तंत्रज्ञानात करिअर करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयांत चांगले गुण मिळणे गरजेचे आहे.

कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग : कॉम्प्युटर सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगला विशेष महत्त्व आहे. हे दळणवळणाचे प्रमुख साधन आहे. या आधारावरच तंत्रज्ञानाचे ज्ञान जिवंत आहे. कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग हा एकप्रकारचा कोडिंग प्रोग्रॅम आहे. कोणताही प्रोग्रॅम तयार करण्यासाठी विविध प्रकारच्या संगणकीय भाषांचा प्रयोग केला जातो. कोडिंग माध्यमातून कॉम्प्युटर प्रोग्रॅम तयार करण्याच्या पद्धतीलाच ‘कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग’ असे म्हटले जाते.

विशेष म्हणजे कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगच्या सुरुवातीला असेंब्ली, सी. जावा, स्क्रिप्ट, ऑरेकल, डॉस आदी भाषांची माहिती दिली जाते. कोणताही प्रोग्रॅम तयार करताना या भाषेला विशेष महत्त्व आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना फ्रंटएंड तसेच बँकएंड म्हणजेच स्टोअरेजच्या पद्धतीचे देखील आकलन केले जाते. फ्रंटएंड हे प्रोग्रॅम मॉनिटर स्क्रिनवर विंडोजप्रमाणे चालवले जाते. तर बॅकएंड प्रोग्रॅम केवळ बोर्डच्या माध्यमातून संचलित केले जाते.

कॉम्प्युटरची कोणतीही भाषा शिकण्यासाठी संगणकाची बेसिक माहिती घेणे गरजेचे आहे. सर्वात अगोदर बेसिक अ‍ॅप्लिकेशनचे ज्ञान भरपूर असणे गरजेचे आहे. उदा. एमएस ऑफिस, इंटरनेट, इ मेल, कॉम्प्युटरशी निगडित सिद्धांत आदी. त्यानंतर इनपूट-आऊटपूट डिव्हाईस, त्याचा वापर करणे, डेटाचे ज्ञान, अंकगणितीय ज्ञान आणि कामगिरी, पुनरावृत्ती आदींचे आकलन करणेदेखील तितकेच महत्त्वाचे. प्रोग्रॅम तयार करताना त्याचे कोड, संकलन, दस्तावेज तयार करणे, एकीकरण, देखभाल गरजांचे विश्लेषण, सॉफ्टवेअर, वास्तुकला, सॉफ्टवेअर परीक्षण करता येणे गरजेचे आहे.

कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी दोन प्रकारचा अभ्यास करावा लागेल. पहिले म्हणजे तांत्रिक पदवी प्राप्त करणे आणि दुसरे म्हणजे कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगमध्ये डिप्लोमा करणे. कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या विपूल संधी आहेत. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कॉम्प्युटर प्रोग्रॅमर, कॉम्प्युटर टिचर, प्राध्यापक, सॉफ्टवेअर इंजिनिअर आदी होऊ शकतात. तसेच ते स्वत:चे सायबर कॅफे आणि कोचिग सेंटरही सुरू करू शकतात. ते आऊटसोर्सिंग करून आपली सेवा प्रदान करु शकतात.

महेश कोळी

Back to top button