नेते चुकले तर जनता धडा शिकवतेच : शरद पवारांचे सूचक विधान, पुन्‍हा जवाहर राठोड यांच्‍या कवितेचे वाचन | पुढारी

नेते चुकले तर जनता धडा शिकवतेच : शरद पवारांचे सूचक विधान, पुन्‍हा जवाहर राठोड यांच्‍या कवितेचे वाचन

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशासमोर आज विविध प्रश्‍न आहेत. त्‍याचबरोबर आर्थिक संकटही आहे. भाजप सरकार जनतेच्‍या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करत आहे, असा आराेप करत या देशातील नागरिकांनी आणिबाणीनंतर इंदिरा गांधी यांचे सरकार पाडले होते. त्‍यानंतर आलेल्‍या मोरारजी देसाई यांचेही सरकार पाडले. जनता सुजाण आहे. नेते चुकले तर जनता धडा शिकवतेच. असे सूचक विधान आज राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांनी केले. पुरंदर येथे माध्‍यमांशी बोलण्‍यापूर्वी त्‍यांनी पुन्‍हा एकदा जवाहर राठोड यांची पाथरवट ही कविता वाचून दाखवली.

यावेळी शरद पवार म्‍हणाले की, “देशासमोर आज विविध प्रश्‍न आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेली घटना ही आपली जमेची बाजू आहे. बाबासाहेब यांच्‍या घटनेमुळे आज देश एकसंघ आहे. राज्‍यघटनेने देशाला एकसंघ ठेवले आहे.”

शरद पवारांनी पुन्‍हा वाचली जवाहर राठोड यांची कविता

बुधवारी सातार्‍यातील भारतीय भटके विमुक्‍त विकास व संशोधन संस्‍थेने आयोजित केलेल्‍या कार्यक्रमात पवारांनी जातीयवादावर बोलताना जवाहर राठोड यांच्‍या एका कवितेचा उल्‍लेख केला होता. पवारांनी आज पुन्‍हा एकदा त्‍या कवितेचे वाचन केले. महाराष्‍ट्र भाजपच्‍या ट्विटरच्‍या हँडलवरुन शरद पवारांच्‍या सातार्‍यातील भाषणाचा व्‍हिडीओ ट्‍विट केला होता. तसेच पवार हे हिंदू देवीदेवतांचा अपमान करत आहेत असा आरोपही भाजपच्‍या वतीने करण्‍यात आला होता. पवार यांनी पुन्‍हा एकदा जवाहर राठोड यांच्‍या कवितेचे वाचन करत  भाजपला प्रत्‍युत्तर दिले.

शरद पवार नेमकं काय म्‍हणाले होते?

भारतीय भटके विमुक्‍त विकास व संशोधन संस्‍थेने आयोजित सभेत पवार म्‍हणाले होते की, पूर्वी मी औरंगाबादला जायचाे. तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्‍थापन केलेल्‍या मिलिंद कॉलेजमध्‍ये उपेक्षित समाजातील मुले आणि मुली शिकायची. यातील काही मुले उत्तम लिखाण करायची.

त्‍यावेळी जवाहर राठोड हा एक कवी होता. आज ते हयात नाहीत; परंतू त्यांनी लिहिलेली कविता मला आठवते. पाथरवट अशी ती कविता होती. यामध्‍ये कवी म्‍हणतो, तुमचा दगड धोंडा आम्‍ही आमच्‍या छन्‍नी आणि हातोड्याने फोडतो. त्‍यातून तुमच्‍या घरात पीठ तयार करायला जे लागते ते आम्‍ही घडवतो. ज्‍या जात्‍यातून पिठ निघंत त्‍याने तुमचं पोट भरतं. आज आम्‍ही अनेक गोष्‍टी घडवल्‍या. आमच्‍या छनीने, हातोड्याने आणि घामाने. तुम्‍ही ज्‍यांची पूजा करता त्‍या ब्रह्मा, विष्णू महेश यांच्‍या मूर्ती आम्‍ही घडवल्‍या. तुम्‍ही त्‍या मंदिरात ठेवल्‍या आणि साल्‍यांनो, तुम्‍ही आम्‍हाला त्‍या मंदिरात जावू देत नाही. मला तुम्‍हाला प्रश्‍न विचाराचा आहे की, ब्रह्मा, विष्णू आणि महेश आम्‍ही आमच्‍या हाताने घडवला. हा तुमचा देव, तुमच्‍या देवाचे बाप आम्‍ही आहोत. त्‍यामुळे आमच्‍यावरील अन्‍याय सहन करणार नाही, अशी कविता जवाहर राठोड यांनी लिहिल्‍याचे शरद पवारांनी यावेळी सांगितले होते.आज पुन्‍हा एकदा या कवितेचे वाचन करत ही कविता कष्‍टकरांची व्‍यथा आणि वेदना आहे, असेही स्‍पष्‍ट करत शरद पवारांनी भाजपच्‍या टीकेला प्रत्‍युत्तर दिले.

हेही वाचा : 

Back to top button