कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गटात बंडखोरी?; रमेश जाधवांचा अपक्ष अर्ज दाखल | पुढारी

कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गटात बंडखोरी?; रमेश जाधवांचा अपक्ष अर्ज दाखल

कल्याण: पुढारी वृत्तसेवा: कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत राजकीय भूकंपाचा ज्वालामुखी फुटू लागला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट विरोधात शिवसेना शिंदे गट यांच्यातील प्रतिष्ठेच्या अटीतटीच्या महासंग्रामाला सुरूवात झाली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर व शिवसेना शिंदे गटाचे डॉ. श्रीकांत शिंदे निवडणूक रिंगणात उतरले असतानाच उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी आज (दि.३) शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर रमेश जाधव यांनी ऐनवेळी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीच्या महासंग्रमात ट्विस्ट आला आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघाची निवडणुकी कडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.शिवसेना उध्दव ठाकरें गटाच्या वतीने वैशाली दरेकर यांनी महविकास आघाडीची उमेदवारी घोषित केल्या नंतर शिवसेना शिंदे गटाने डॉ. श्रीकांत शिंदे यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे.शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांनी निवडणूक प्रचाराला सुरूवात केल्यापासून प्रचारात विश्वासात घेतले जात नसल्याचे डोंबिवलीतील ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. नुकत्याच काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला धक्का बसला होता.

त्यांच्या प्रवेशानंतर अखेरच्या दिवशी मोठा स्फोट होणार यासारख्या चर्चा रंगल्याने पुढील चाल कोणती असणार, काय मोठी खेळी खेळली जाणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. ठाकरे गटाच्या उमेदवाराला शह देण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरु असल्याची कुणकुण लागली होती. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून प्रसंगावधान राखून अखेरच्या क्षणी कल्याण डोंबिवलीतील उबाठाचे निष्ठावंत शिवसैनिक रमेश जाधव यांना अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरण्यासाठी सांगण्यात आले.

अधिकृत उमेदवाराचा अर्ज काही कारणास्तव बाद झाला. तर अपक्ष उमेदवार जाधव यांना पक्षाचा ए बी फॉर्म फिरवून निवडणुकीच्या रिंगणात टिकवणे ठाकरे गटाला शक्य होऊ शकेल, यासाठीच हा प्रयत्न असल्याचे पक्षाच्या काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. यामुळेच शनिवारी होणाऱ्या छाननी आणि त्यानंतर माघारीत नेमके काय घडणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आम्ही पक्षाचा आदेश मानणारे असून पक्षाने आदेश दिल्याप्रमाणे रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. पक्षाच्या काही रणनीती असतात. काही गोष्टी असतात. त्या सर्व उघड करायच्या नसतात. यापूर्वी कुठल्या पक्षात दोन दोन फॉर्म भरले नाहीत का ? हे काही नवीन नाही. जाधव यांनी पक्षाने दिलेल्या आदेशा प्रमाणे उमेदवारी अर्ज भरल्याचे वैशाली दरेकर यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button