विनवण्या करून मिळते हंडाभर पाणी, वडगाव-सिन्नरच्या मिळन वस्तीची व्यथा | पुढारी

विनवण्या करून मिळते हंडाभर पाणी, वडगाव-सिन्नरच्या मिळन वस्तीची व्यथा

सिन्नर (जि. नाशिक) : संदीप भोर
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष या गावचे…भाजपचे तालुकाध्यक्षही याच गावचे आणि सध्या सरपंचपद शिवसेनेकडे आहे. तरीही इथली एक आदिवासी वस्ती वर्षानुवर्षे पाणी आणि रस्ता या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि आदिवासींच्या आरोग्याचाही प्रश्न कायम आहे. हे गाव काही दर्‍या-खोर्‍यात अथवा दुर्गम भागात नाही. सिन्नरपासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या वडगाव-सिन्नरच्या मिळन वस्तीची ही व्यथा आहे.

वडगाव-सिन्नर या गावाची लोकसंख्या तीन हजारांच्या आसपास असून, बहुतांश लोक वस्त्यांवर विखुरलेले आहेत. अनेक वर्षांपासून गावाच्या पूर्वेला एक-दीड किमीवर नदीकाठी ही वस्ती वसलेली आहे. स्वमालकीच्या जमिनींमध्ये कोपरा धरून आदिवासी बांधवांनी झोपडीवजा घरे बांधलेली आहेत. या वस्तीची लोकसंख्या अडीचशेच्या आसपास. निवडणूक काळात उमेदवार आणि त्यांचे पाठीराखे बांधावरच्या वाटा तुडवत मतांचा जोगवा मागण्यासाठी आदिवासी बांधवांच्या झोपडीवजा घरांचे उंबरे झिजवतात. निवडणुका संपल्या की परागंदा होतात, अशी आदिवासींची तक्रार आहे. त्यामुळे समस्या ‘जैसे थे’ राहतात.

विनवण्या करून मिळते हंडाभर पाणी
या वस्तीसाठी कधीकाळी एक हापसा अर्थातच हातपंप देण्यात आलेला आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हातपंप नादुरुस्त असल्याने आदिवासींना पाण्यासाठी आसपासच्या शेतकर्‍यांच्या विहिरीवरून पाणी शेंदून आणावे लागते. सध्या पाण्याची टंचाई असल्याने शेतकरीदेखील त्यांना उभे करत नाहीत, असे काही महिलांनी सांगितले. शिव्या ऐकत एखादा हंडा कसाबसा भरून मिळतो. पिण्याच्या पाण्यासाठी ढोकी देवीच्या मंदिराजवळ जवळपास पाच लाख रुपये खर्चून सिमेंट टाकी बांधण्यात आली आहे. मात्र, या टाकीत पाणी पडत नाही आदिवासींनाही पाणी मिळत नाही, अशी बिकट स्थिती आहे.

ग्रामपंचायतीने हातपंप दुरुस्तीसाठी प्रस्ताव दिल्यास तत्काळ कार्यवाही करता येऊ शकेल. प्रस्ताव असो नसो हातपंप दुरुस्ती केली जाईल. तसेच एक ते दोन दिवसात टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात येईल.
– एम. बी. मुरकुटे,
गटविकास अधिकारी सिन्नर

ग्रामपंचायतचे लोक वर्षाच्या वर्षाला घरपट्टी गोळा करायला येतात. पण सोयी द्यायला मागे हटतात. नळपट्टी चालू अन् नळ मात्र बंद आहेत. सुविधा दिल्या तर ठिक नाही तर आम्ही ग्रामपंचायत आणि पंचायत समितीवर मोर्चा काढू.
– भीमाबाई माळी, यशवंत वाघ, रहिवासी वडगाव-सिन्नर

पावसाळ्यात जडतो चिखल्यांचा आजार…
जवळपास 50 विद्यार्थी शिक्षणासाठी गावातील शाळेत जातात. मात्र, वस्तीवर पोहोचण्यासाठी कच्चा अथवा पक्का रस्ता नाही. त्यामुळे बांधाबांधाने कसरत करीत शाळेत ये-जा करावी लागते. पावसाळ्यात तर हाल होतात. चिखलात येऊन-जाऊन मुलांच्या पायाला चिखल्यांचा आजार होतो. काही शेतकर्‍यांनी शेतातून स्वखर्चाने वस्तीच्या आसपास रस्ता बनवला आहे. मात्र, या पाणंद रस्त्याचा मर्यादित वापर आदिवासींना होतो. चारचाकी वाहनांना मज्जाव केला जातो, अशी आदिवासींची खंत आहे. एखादा माणूस आजारी पडला, बाळंतपणासाठी विवाहितेला घेऊन जायचे असल्यास अर्धा ते एक किमी उचलून न्यावे लागते. रस्ताच नसल्याने पाण्याचा टँकरदेखील वस्तीपर्यंत पोहोचत नसल्याने पाण्यासाठी हाल होतात.

हेही वाचा :

Back to top button