नाशिक : बिटकोतील ‘सीटीस्कॅन, एमआरआय’ आऊटसोर्सिंगची फाइल लालफितीत | पुढारी

नाशिक : बिटकोतील ‘सीटीस्कॅन, एमआरआय’ आऊटसोर्सिंगची फाइल लालफितीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या दोन अडीच वर्षांपासून महापालिकेच्या बिटको रुग्णालयात कोट्यवधींची एमआरआय आणि सीटीस्कॅन मशीनरी धूळ खात आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार आणि त्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाला आदेश देऊनही कार्यवाही होत नसून, गेल्या पंधरा दिवसांपासून आऊटसोर्सिंगची फाइल लेखा व वित्त तसेच ऑडिट विभागाकडे पडून आहे.

गोरगरीब आणि सर्वसामान्य रुग्ण आधीच अनेक अडचणीतून जात असतात. त्यातून त्यांना किमान आर्थिक आधार मिळावा यादृष्टीने महापालिकेने 2015 मध्ये पार पडलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निधीतून सुमारे 18 कोटींचे एमआरआय मशीन आणि चार कोटींचे सीटीस्कॅन मशीन खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार केला. परंतु, मशीनरी खरेदी करण्यातही महापालिकेने मोठी दिरंगाई केली. सिंहस्थानंतर दोन वर्षांनी मशीनरी खरेदी करण्यात आली. परंतु, त्यानंतर पुन्हा दोन ते अडीच वर्षांपासून ही मशीनरी बिटको रुग्णालयात आजमितीस धूळ खात पडून आहे. महापालिकेकडे मशीनरीच्या वापरासाठी तंत्रज्ञच उपलब्ध नाहीत. असे असताना मशीनरी खरेदी करण्याची बाब अनाकलनीय असून, आता मशीन असूनही त्याचा वापर करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ पुरविले जात नसल्याने सामान्य रुग्णांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

यासंदर्भात नगरसेवकांसह मनपा पदाधिकार्‍यांनी अनेकदा मागणी करूनही त्याकडे आजवर दुर्लक्ष झाले आहे. महापालिकेच्या आयुक्तपदी रमेश पवार यांची नियुक्ती झाल्यानंतर बिटको रुग्णालयाच्या पाहणी दौर्‍यात त्यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले, तर यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापालिकेत आढावा बैठक घेऊन बिटको रुग्णालयात मशीनरींसाठी तत्काळ आऊटसोर्सिंग उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आरोग्य वैद्यकीय विभागाने प्रस्ताव लेखा आणि लेखापरीक्षण विभागाकडे मान्यतेसाठी सादर केली. मात्र, आज पंधरा दिवसांनंतरही त्यावर संबंधित विभागांकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.

कुशल मनुष्यबळासह मशीनरींची देखभाल, दुरुस्ती आणि मशीनरीपोटी येणारे वीजबिल याची जबाबदारी आऊटसोर्सिंगद्वारे पात्र ठरणार्‍या संस्थेनेच भरायचे असून, लेखा विभागाकडून फाइल मंजूर झाल्यानंतर आरोग्य वैद्यकीय विभागाकडून निविदा प्रक्रिया प्रसिद्ध केली जाणार आहे.

शासकीय दरामध्येच सेवा उपलब्ध
खासगी डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सीटीस्कॅन आणि एमआरआयसाठी अधिक दर मोजावे लागतात. त्यामुळे मनपाने शासकीय दर निश्चित केले असून, या दरानुसारच आऊटसोर्सिंगद्वारे नेमल्या जाणार्‍या संस्थेने रुग्णांना सेवा उपलब्ध करून द्यायची आहे. शासकीय दरानुसार सीटीस्कॅनसाठी 800 रुपये, तर एमआरआयसाठी 1,500 रुपयांपासून शुल्क आकारणी केली जाणार आहे. एमआरआयमध्ये विविध प्रकार असून, त्यानुसार दर आकारणी केली जाणार आहे. खासगी सेंटरमध्ये एमआरआयसाठी तीन हजारांपासून पुढे दर आकारले जातात.

हेही वाचा :

Back to top button