गेवराई, पुढारी वृत्तसेवा : प्रसाद कॉटन जिनिंगच्या ऑईल मिल युनिटला अचानक आग लागली. या आगीमध्ये जवळपास 27 लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी (दि.1) कामगार दिनी घडली. तर यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. आग विझविण्यासाठी नगर परिषद गेवराई व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अग्नीशमन गाड्या व खासगी टँकर्सला पाचारण करण्यात आले होते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई – बीड रोडवर असलेल्या प्रसाद कॉटन जिनिंगला रविवार आग लागली. कामगार दिन असल्याने उत्पादनाचे काम बंद होते. प्रसाद कॉटन इंडस्ट्रीयच्या ऑईल मिल युनिटला अचानक भीषण आग लागली. या आगीने रौद्र रूप धारण केल्यानंतर कामगार वस्तीवरील कामगारांच्या ही आग निदर्शनास आली. कामगारांनी अग्नीशमन यंत्र कार्यान्वित केली. परंतु आगीमुळे गोडाउनचे शटर उघडू शकले नाही.
काही वेळातच आगीने रौद्र रुप धारण केले. त्यानंतर कंपनीचे व्यवस्थापक यांनी जेसीबीच्या मदतीने शटर तोडले. परंतु आग ही पुर्ण गोदामात पससरली. यामुळे जिनिंगमधील कापसाच्या गाठी जळून नष्ट झाल्या होत्या. नगर परिषद गेवराई व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अग्नीशमन गाड्या व खासगी टँकर्सला पाचारण करण्यात आले. या आगीत जवळपास 27 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हेही वाचा