सातारा : खा. उदयनराजेंकडून आरोग्य विभागाला कानपिचक्या | पुढारी

सातारा : खा. उदयनराजेंकडून आरोग्य विभागाला कानपिचक्या

सातारा : पुढारी वृत्तसेवा शहरातील रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लावावीत. संबंधित ठेकेदारांकडून कामे होत नसतील तर पर्यायी व्यक्तींकडून करुन घ्या अशी सुचना खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सातारा पालिकेच्या बांधकाम विभागाला केल्या. शहरात ठिकठिकाणी कचर्‍यांची समस्या दिसून येत आहे. शहरात कचरा दिल्यास गय करणार नाही, अशा शब्दांत खा. उदयनराजेंनी आरोग्य विभागाला कानपिचक्या दिल्या.

सातारा नगरपालिकेकडून शहरात सुरु असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी जलमंदिर पॅलेस या त्यांच्या निवासस्थानी प्रशासकीय बैठक घेतली. यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक किशोर शिंदे, नगर अभियंता दिलीप चिद्रे, सुधीर चव्हाण, कोमल साबळे, पाणीपुरवठा अभियंता शहाजी वठारे, दिग्विजय गाढवे, रत्नाकर वढाई, आरोग्य विभाग प्रमुख प्रकाश राठोड, भाग निरीक्षक सागर बडेकर आदि उपस्थित होतेे.

बैठकीत सुरुवातील खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी शहरात कुठल्या योजनेतून कुठल्या प्रकल्पांची कामे सुरु आहेत, किती कामे पूर्ण व किती कामे अपूर्ण आहेत याची माहिती घेतली. कामे रखडल्याने त्यांनी ठेकेदारांना सुनावले. क्रशर बंद असून डांबराचे दर वाढल्याने कामे परवडत नसल्याचे कारण काही ठेकेदारांनी सांगितले. काहीही झाले तरी पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे झाली पाहिजेत. रस्त्यांची कामे परवडत नसतील तर ती दुसर्‍या ठेकेदारांना द्यावीत, अशी सुचनाही खा. उदयनराजे यांनी बांधकाम विभागाला केली.

शहरात ठिकठिकाणी कचर्‍याची समस्या आहे. वेळेवळर कचरा उचलला जात नसल्याने तक्रारी येत असतानाही आरोग्य विभागाकडून कार्यवाही होत नसल्याने खा. उदयनराजे भोसले यांनी आरोग्य विभागाला सुनावले. सतत कचरा साचणारी ठिकाणे तातडीने स्वच्छ करावीत. नागरिकांची गैरसोय होता कामा नये. शहरात कचरा दिसल्यास गय करणार नाही, असा इशाराही त्यांनी आरोग्य विभागाला दिला. शहराच्या विकासाच्या अनुषंगाने खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्याशी चर्चा केली.

हेही वाचलतं का?

Back to top button