सांगली : टेम्पो ड्रायव्हरचा मुलगा आला राज्यसेवा परीक्षेत राज्यात पहिला, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मिळवले यश | पुढारी

सांगली : टेम्पो ड्रायव्हरचा मुलगा आला राज्यसेवा परीक्षेत राज्यात पहिला, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मिळवले यश

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सोनी (ता. मिरज) येथील प्रमोद बाळासाहेब चौगुले यांनी दुसर्‍या प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवेच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्यांच्या सोनी येथील मूळ गावी व सांगलीतील घरी मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. मोठ्या कष्टातून सेवेत पहिल्या क्रमांकावर बाजी मारल्याने आई-वडिलांना अश्रू अनावर झाले होते.

प्रमोद चौगुले त्यांचे प्राथमिक शिक्षण सोनी येथे झाले होते. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण पलूस (जि. सांगली) येथील नवोदय विद्यालय येथे झाले होते. त्यांनी कराड येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. उच्चशिक्षित प्रमोद चौगुले यांची भारत पेट्रोलियममध्ये निवड झाली होती. चौगुले यांनी जामनगर येथे सेवा बजावली आहे. भारत पेट्रोलियममध्ये काम करत असताना येणार्‍या वेगळ्या अधिकार्‍यांच्या संपर्कातून त्यांना स्पर्धा परीक्षेची प्रेरणा मिळाली. त्यांनी यूपीएससीची तयारी केली. परंतु त्यांना त्यामध्ये यश आले नाही. परंतु महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्‍या राज्यसेवेच्या परीक्षेत मात्र त्यांनी केवळ दुसर्‍या प्रयत्नात घवघवीत यश मिळवत पहिल्या क्रमांकावर बाजी मारली. पहिल्या प्रयत्नात यांची एका मार्कात संधी हुकली होती. त्याची कसर भरून काढत त्यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे.

वडील टेम्पो ड्रायव्हर, आई करते शिवणकाम…

प्रमोद चौगुले यांचे वडील बाळासो चौगुले हे ड्रायव्हर होते. तर आई घरी शिवणकाम करते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत प्रमोद चौगुले यांनी यश मिळवले आहे.

मेव्हणे उपजिल्हाधिकारी…

प्रमोद चौगुले यांचे मेहुणे प्रसाद चौगुले हे गेल्यावर्षी जाहीर झालेल्या राज्यसेवेच्या निकालात राज्यात प्रथम आले होते. त्यांचे सध्या पुण्यात उपजिल्हाधिकारी पदाचे प्रशिक्षण सुरु आहे. गेल्यावर्षी मेहुणे तर यावर्षी प्रमोद चौगुले हे राज्यसेवेच्या परिक्षेत राज्यात प्रथम आल्याने कुटुंबात जल्लोषाचे वातावरण होते.

Back to top button