लखनौचा विजयी ‘षटकार’

लखनौचा विजयी ‘षटकार’ www.pudharinews.
लखनौचा विजयी ‘षटकार’ www.pudharinews.
Published on: 
Updated on: 

मुंबई ः वृत्तसंस्था मोहसीन खान, कृणाल पंड्या आणि दुष्मंता चमिरा यांच्या तिखटजाळ गोलंदाजीच्या जोरावर लखनौने पंजाबवर सफाईदार विजय संपादला. लखनौचे आता 9 सामन्यांतून 6 विजयांसह 12 गुण झाले आहेत. त्यांनी गुणतालिकेत तिसर्‍या स्थानावर झेप घेतली आहे. पंजाबचे 9 सामन्यांतून 8 गुण झाले असून त्यांची सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यांना शुक्रवारी पाचवा पराभव स्वीकारावा लागला.

पंजाबकडून ऋषी धवनने तीन चौकार व एक षटकार खेचून 21 धावा चोपल्या खर्‍या, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. विजयासाठी पंजाबपुढे 154 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्याचा पाठलाग करताना पंजाबचा संघ 8 गडी गमावून 133 धावांपर्यंतच मजल मारू शकला. पंजाबकडून कर्णधार मयंक अग्रवालने 21 तर सलामीवीर शिखर धवनने 5 धावा केल्या. त्याला रवी बिश्नोईने फिरकीच्या जाळ्यात अडकवले. जॉनी बेअरस्टोने 32 धावांची चमकदार खेळी केली. मात्र, भानुका राजपक्षे 9 धावांवर बाद झाला.

लियाम लिव्हिंगस्टोनने 17 धावा जमवल्या. जीतेश शर्मा फक्त 2 धावा करून तंबूत परतला. अग्रवाल आणि बेअरस्टो यांना दुष्मंता चमिराने तंबूचा रस्ता दाखवला. जीतेश शर्मा आणि राजपक्षेला कृणाल पंड्याने बाद केले. तसेच लिव्हिंगस्टोन आणि कागिसो रबाडा यांना मोहसीन खानने टिपले. त्यामुळे पंजाबचा संघ दबावाखाली आला. पाठोपाठ राहुल चहर हाही अवघ्या 3 धावा करून तंबूत परतला. त्याला मोहसीन खानने बाद केले. आता 12 चेंडूंत पंजाबला 37 धावा हव्या होत्या.

त्यापूर्वी पंजाबने नाणेफेक जिंकून लखनौला फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. मात्र, कागिसो रबाडाच्या भेदक मार्‍यापुढे लखनौची फलंदाजी कोलमडली. सलामीवीर क्विंटन डी कॉकने 46 धावांची सुरेख खेळी केली. त्याने 37 चेंडूंचा सामना करताना चार चौकार व दोन षटकारांची आतषबाजी केली. कर्णधार लोकेश राहुल फार काळ टिकला नाही. केवळ 6 धावांवर रबाडाने त्याला जीतेश शर्माच्या हाती झेल द्यायला भाग पाडले. दीपक हुड्डाने चमकदार 34 धावा फटकावल्या. त्यानंतर लखनौला ठराविक अंतराने चार धक्के बसले.

कृणाल पंड्या 7, मार्कुस स्टॉयनिस 1, आयुष बदोनी 4 आणि अष्टपैलू जेसन होल्डर 11 हे बिनीचे फलंदाज बाद झाले. त्यामुळे लखनौच्या धावांना आपोआपच खीळ बसली. पंजाबच्या तिखट गोलंदाजीपुढे लखनौच्या फलंदाजांची मात्रा चालली नाही. दुष्मंता चमिरा याने 17 धावांची झटपट खेळी केली आणि त्यालाही रबाडानेच टिपले. चमिराने 10 चेंडूंचा सामना करताना दोन उत्तुंग षटकार खेचले. लखनौकडून एकूण 8 चौकार आणि 8 षटकार ठोकले गेले. मधळी फळी गडगडल्यामुळे लखनौचे मोठी धावसंख्या उभारण्याचे स्वप्न भंगले.

स्टॉयनिस आणि होल्डर यांना राहुल चहरच्या फिरकीने चकवले. बदोनी आणि कृणाल हे रबाडाचे बळी ठरले. 18 षटकांचा खेळ संपला तेव्हा लखनौने 132 धावा केल्या होत्या. अखेर 20 षटकांचा खेळ संपला तेव्हा लखनौने 8 बाद 153 धावा केल्या. पंजाबकडून रबाडाने 4 षटकांत 38 धावा देऊन लखनौचे चार मोहरे गारद केले.

राहुल चहरने 4 षटकांत 30 धावा देत 2 गडी बाद केले. तसेच संदीप शर्माने 4 षटकांत केवळ 18 धावा मोजून 1 गडी तंबूत पाठवला. अर्शदीप सिंग याने 4 षटकांत 23 धावा मोजल्या. तसे पाहिले तर पंजाबच्या सर्वच गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. त्यामुळे लखनौच्या धावगतीला आपोआप वेसण बसली.

हेही वाचलतं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news