बैठक कोरोनाची, पण मोदींच्या टीकेचा बाण महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालकडे ! | पुढारी

बैठक कोरोनाची, पण मोदींच्या टीकेचा बाण महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालकडे !

पुढारी ऑनलाईन डेस्क : पेट्रोल, डिझेलच्या दरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र, पश्चिम बंगालला आवाहन करताना इंधनावरील व्हॅट कमी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. लोकांच्या हितासाठी इंधनावरील व्हॅट कमी करा, असे त्यांनी म्हटले आहे. देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर पंतप्रधान मोदी यांनी आज (दि. २७) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरावर भाष्य केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, गुजरात आणि कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्र, पश्चिम बंगालने पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करून जनतेला दिलासा द्यावा. मुंबईपेक्षा दीव दमणमध्ये पेट्रोल, डिझेल स्वस्त आहेत. पेट्रोल, डिझेलवरीव कर केंद्र सरकारने कमी केल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. भारत सरकारचा ४२ टक्के महसूल राज्यांना दिला जातो. त्यामुळे तुम्ही तुमच्या राज्याच्या आणि शेजारच्या राज्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे. आज पेट्रोल तामिळनाडूमध्ये १११ रुपये, जयपूरमध्ये ११८, हैदराबादमध्ये ११९ पेक्षा जास्त आहे. मुंबईत १२० आणि शेजारच्या दमण दीवमध्ये १०२ रूपये असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना योद्ध्यांनी आतापर्यंत केलेले काम कौतुकास्पद आहे. काही राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असून कोरोनाचे आव्हान अजूनही संपलेले नाही. गेल्या काही दिवसांत युरोपसह अनेक देशांमध्ये रुग्ण वाढू लागले आहेत. परंतु, सध्या तरी भारतातील परिस्थिती नियंत्रणात आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्ण वाढ होऊ लागल्याने आपण सतर्क राहिले पाहिजे. मागील तीन लाटेतून आपणाला खूप काही शिकता आले आहे. सर्वांनी ओमायक्रॉनचा यशस्वीपणे सामना केला, असे मोदी यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button