नाशिक : श्रीपाद अमृत डांगेंचे कुटुंबीय सापडेना, केंद्र सरकारच्या पत्रानंतर शोध सुरु | पुढारी

नाशिक : श्रीपाद अमृत डांगेंचे कुटुंबीय सापडेना, केंद्र सरकारच्या पत्रानंतर शोध सुरु

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशातील 75 जिल्ह्यांमधील 75 स्वातंत्र्य-सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान करणे, विकास योजनांच्या अंमलबजावणीमध्ये त्यांना सहभागी करून घेण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. त्यासाठी राज्यातील नाशिक, रायगड व वर्धा या जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून निफाड तालुक्यातील करंजगाव येथील कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या कुटुंबीयांचा जिल्हा परिषदेतर्फे शोध सुरू आहे.

देश सध्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारतर्फे अनेक योजना राबवल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच 75 जिल्ह्यांमध्ये 75 सरोवर बांधण्याचा संकल्प जाहीर केला आहे. त्यानंतर 75 जिल्ह्यांमधील 75 स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांचा सन्मान करण्याच्या सूचना केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने राज्य सरकारांना दिल्या आहेत. त्यासाठी 75 जिल्ह्यांमधील 75 स्वातंत्र्यसैनिकांची यादीही दिली आहे.

राज्यात नाशिक जिल्ह्यातील कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, वर्धा जिल्ह्यातील पांडुरंग सदाशिव खानखोजे, रायगड जिल्ह्यातील आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, भाई जगताप व विनोबा भावे यांचा समावेश आहे. केंद्र सरकारने सामाजिक व आर्थिक मागासलेपणाच्या आधारावर या 75 जिल्ह्यांची निवड केली असून, येथे सरकारच्या विविध योजना शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत या योजनांच्या माध्यमातून पोहोचण्याचा हेतू आहे. यासाठी केंद्र सरकारच्या नऊ मंत्रालयांच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी या जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मानाचा आधार घेण्यात आला आहे.

स्वातंत्र्य चळवळीशी संंबंधित महत्त्वाच्या दिवशी बचतगट, शिक्षणसंस्था, स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून या स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याला उजाळा देण्याबरोबरच योजनांची अंमलबजावणी करण्याचा हेतू आहे. याबाबत नाशिक जिल्हा परिषदेला पत्र मिळाले असून, त्यानंतर कॉ. डांगे यांच्या कुटुंबीयांचा शोध सुरू आहे.

कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांचे गाव निफाड तालुक्यातील करंजगाव येथे असून, त्यांच्या जन्मस्थळाला भेट देणार आहे. त्यानंतर स्थानिकांशी याबाबत चर्चा करून सरकारच्या सूचनांनुसार त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल.
– रवींद्र परदेशी,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग

हेही वाचा :

Back to top button