पूर नियंत्रणासाठी लघुप्रकल्प टप्प्याने भरणार | पुढारी

पूर नियंत्रणासाठी लघुप्रकल्प टप्प्याने भरणार

कोल्हापूर; अनिल देशमुख : महापुराचा धोका टाळून करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील लघुप्रकल्पातील पाणी साठवण्याचे नियोजन केले जाणार आहे. हे प्रकल्प टप्प्याटप्प्याने भरले जाणार आहेत. परिणामी यंदा पूर आलाच तर त्यामध्ये या लघुप्रकल्पाच्या पाण्याची भर पडू नये असा यामागील हेतू आहे. असा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

गेल्या वर्षी जिल्ह्यातील एकही मोठा प्रकल्प भरला नसताना, पंचगंगेला महापूर आला. यापूर्वी कधी नव्हे अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली. निम्मे कोल्हापूर शहर पाण्यात बुडाले आणि कोट्यवधी रुपयांची हानी झाली. धरणातून पाणी सोडलेले नसतानाही पाणी पातळीत वाढ झाली.

पंचगंगा खोर्‍यातील काही लघू पाटबंधारे प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग यादरम्यान झाल्याचे पुरानंतर स्पष्ट झाले. याबाबत विविध ठिकाणचा पाऊस, लघू पाटबंधारे प्रकल्पात साचलेले पाणी आणि तेथून झालेला विसर्ग या सर्वांची आकडेवारी जमा करून आता याबाबतचा निर्णय घेतला जात आहे.

जिल्ह्यात 54 लघू पाटबंधारे प्रकल्प आहेत. यापैकी 14 प्रकल्प हे पंचगंगा खोर्‍यात आहेत. यापैकी काही प्रकल्प पावसाळ्यात लवकर भरतात आणि त्यातून सप्टेंबर अखेरपर्यंत सतत पाण्याचा विसर्ग सुरू असतो. पंचगंगा खोर्‍यात असलेले प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्यातून सुमारे 10 ते 15 हजार क्यूसेकचा एकूण विसर्ग होत असतो. हे प्रमाण जरी कमी झाले तरी एक-दीड फुटाने पूरपातळी कमी होऊ शकते, असा अंदाज आहे.

यंदा भूस्खलनाचा धोकाही टाळणार

जिल्ह्यात गेल्या वर्षी सहा ठिकाणी लघुपाटबंधारे प्रकल्पाशेजारीच भूस्खलन झाले. असा प्रकार प्रकल्पालगतच घडला तर मोठी हानी होऊ शकते. यामुळेही हे प्रकल्प टप्प्याटप्प्याने कसे भरता येतील, याचेही नियोजन सुरू आहे. पालकमंत्री तसेच जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक होणार आहे.

Back to top button