महाराष्ट्रात केंद्रीय पथक पाठवा! | पुढारी

महाराष्ट्रात केंद्रीय पथक पाठवा!

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडी, आरोप-प्रत्यारोपांमुळे तापलेल्या राजकारणाचा मुद्दा दिल्ली दरबारी पोहोचला आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांची भेट घेतली. सोमय्यांसह इतरांवर गेल्या काळात झालेल्या हल्ल्यांच्या चौकशीसाठी केंद्रीय पथक पाठविण्याची विनंती शिष्टमंडळाने गृह सचिवांना केली.

शिष्टमंडळाकडून राज्यातील कायदा सुवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. सोमय्यांसह राज्यातील इतर व्यक्तींवर झालेले हल्ले चिंताजनक असून परिस्थितीचा अभ्यास करू, गरज भासल्यास राज्यात पथक पाठवू, असे आश्वासन केंद्रीय गृह सचिवांकडून देण्यात आल्याचे सांगण्यात येते. शिष्टमंडळात आमदार मीहिर कोटेचा, अमित साटम, पराग शाह, राहुल नार्वेकर, विनोद मिश्रा यांचा समावेश होता.

भेटीनंतर पत्रकारांना माहिती देतांना सोमय्या म्हणाले, केंद्रीय गृहसचिवांशी 30 ते 35 मिनिटे सखोल चर्चा झाली. राज्यातील कायदा सुवस्थेसंबंधीची माहिती त्यांना दिल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावर चिंता दिसून आली. सामान्य नागरिकांसह लोकप्रतिनिधींवरील हल्ले, धमक्या, जिवंत गाडण्याची भाषा यासंबंधी त्यांना माहिती दिल्याचे सोमय्या म्हणाले. उद्धव ठाकरे सरकारने उद्धटगिरीची हद्द गाठली आहे. त्यामुळेच राज्यात विशेष पथक पाठवण्याचा आग्रह केला, असे सोमय्या यांनी सांगितले.

नवनीत राणांच्या पत्रानंतर लोकसभा अध्यक्षांनी मागितला अहवाल तुरुंगात पोलिस अधिकार्‍यांकडून जातीयवाद होत असल्याचे पत्र खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठविले आहे. यानंतर याप्रकरणी महाराष्ट्र सरकारने 24 तासांत उत्तर देण्याचे आदेश बिर्ला यांनी दिले आहेत.मी खालच्या जातीची असल्याने तुरुंगात मला पाणी प्यायला दिले जात नाही. मला अश्लील भाषेतही शिवीगाळ केली जात आहे. मी अनुसूचित जातीचे असल्याने मला बाथरूमही वापरण्यास दिले जात नसल्याचा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी पत्रात केला आहे.

शिष्टमंडळाकडून हे आरोप

* शिवसेनेच्या गुंडांकडून नेव्ही अधिकार्‍याला घरात घुसून मारहाण केली.
* मनसुख हिरेनची दोन पोलीस अधिकार्‍यांनी सुपारी घेऊन हत्या.
* केंद्राकडून झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली असताना पोलिसांच्या आवारात जीवघेणा हल्ला होतो.
* महाराष्ट्रात पोलिसांचा माफियासारखा वापर केला जातो.
* पोलिस आयुक्त संजय पांडेही या प्रकारात सहभागी आहेत.
* आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येतात.
* कमांडोज्ना मारले जाते. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले जातात.

Back to top button