राज्यात घडामोडींना वेग; गृहमंत्री वळसे-पाटील शरद पवारांच्या भेटीनंतर वर्षा निवासस्थानी दाखल | पुढारी

राज्यात घडामोडींना वेग; गृहमंत्री वळसे-पाटील शरद पवारांच्या भेटीनंतर वर्षा निवासस्थानी दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी शुक्रवारी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. संपकऱ्यांनी पवारांच्या घरावर चपला, दगड फेक केली. त्यानंतर आता राज्यात घडामोडींना वेग आला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज (शनिवार) सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत.

दरम्यान, पवार आणि वळसे पाटील यांच्या भेटीतील तपशील समजू शकलेला नाही. तर उभयतांच्या भेटीत कालच्या आंदोलनावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तर गृहविभागाच्या त्रुटीवरही चर्चा झाल्याचे समजते. तसेच काही पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भेटीत गृहमंत्री मुख्यमंत्र्यांना लेखी अहवाल सादर करणार आहेत. यावेळी पोलीस आयुक्त संजय पांडे देखील उपस्थित राहणार आहेत. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे भेटीत कोणती चर्चा होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत आज शनिवारी शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले होते. उभय नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड भाजपचं असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याविरोधात गरळ ओकण्यासाठी कोण फंडिग करतंय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. गुणरत्न सदावर्तेंना भाजपचा पाठिंबा असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button