कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक पावले उचला : महाराष्ट्रासह पाच राज्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश | पुढारी

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक पावले उचला : महाराष्ट्रासह पाच राज्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
कोरोना महारोगराईचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रासह दिल्ली, केरळ, हरियाणा तसेच मिझोरमला दिले आहेत. दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्यांना या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना फैलाव होण्याची शक्यता असलेल्या भागांमध्ये नियमित स्वरूपात देखरेख ठेवावी. गरज भासल्यास अशा भागांमध्ये आवश्यक ती पावले उचलून संसर्ग नियंत्रणात आणावा. कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणामुळे कोरोनाविरोधातील युद्धात आतापर्यंत मिळालेले यश निरुपयोगी ठरु शकते, असे मत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना लिहलेल्या पत्रातून व्यक्त केले आहे.

भूषण यांनी संबंधित राज्यांना टेस्टींग, ट्रेसिंग, ट्रीट, लसीकरण तसेच नियमांचे पालन ही पाच सूत्रीय रणनीती वापरण्याची सूचना केली आहे. संसर्गदर अधिक असलेल्या परिसरांमध्ये आवश्यक पावले उचलण्यावर भूषण यांनी भर दिला आहे. गेल्या आठवड्यात या राज्यांच्या संसर्गदरात वाढ झाली आहे.दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत सौम्य वाढ नोंदवण्यात आली असली तरी ही बाब चिंताजनक आहे.

केरळमध्ये गेल्या आठवड्यात २ हजार ३२१ कोरोनाबाधित आढळले होते. देशाच्या दैनंदिन कोरोनाबाधितांपैकी हे प्रमाण ३१.८% आहे. केरळमधील आठवड्याचा संसर्गदर १३.४५ वरून १५.५३ टक्क्यांवर पोहचला आहे. तर, राजधानी दिल्लीत संसर्गदरात ०.५१ टक्क्यांवरून १.२५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

हेही वाचा :

 

Back to top button