नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राज्यांमधील कोरोना सानुग्रह भरपाईसाठी दाखल करण्यात आलेल्या ५% दाव्यांच्या स्वैर छाननीसाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र, केरळ, गुजरात तसेच आंध प्रदेशात केंद्रीय पथके पाठवले आहेत. महाराष्ट्रात पाठवलेल्या तीन सदस्यीय पथकाचे नेतृत्व राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाचे (एनसीडीसी) प्रधान सल्लागार डॉ.सुनील गुप्ता करणार आहेत. तर, एनसीडीसीचे सहसंचालक डॉ.अनूभव श्रीवास्तव आणि सीजीएचएसचे अवर सचिव मनोज कुमार वर्मा यांचा या पथकात समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने ही पथके पाठवण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
पथकांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दिल्या जाणाऱ्या सानुग्रह भरपाईच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचे परीक्षण केले जाईल.
कोरोना सानुग्रह मदत मिळवण्यासाठी दाखल केलेल्या ५% दाव्यांच्या अर्जांची स्वैर छाननी तसेच संबंधित राज्यांमध्ये सानुग्रह भरपाई देण्यासाठी अवलंबलेल्या प्रक्रियेची देखील पडताळणी ही पथके करतील. जिल्हा अधिकार्यांद्वारे दस्तऐवज, सत्यापनासह मंजूर किंवा नाकारण्यात आलेल्या प्रकरणांचा तपशील ही तपासातील.
२४ मार्च २०२२ रोजीच्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार,राज्य सरकारे या पथकांना दाव्याच्या अर्जांची छाननी करण्यात मदत करतील आणि पथकांनी उपस्थित, प्रक्रिया केलेल्या संबंधित दाव्यांचे सर्व आवश्यक तपशील सादर करतील, याची छाननी करून पथकांकडून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला अहवाल सादर केल्यानंतर हा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात येईल.