बारामती; पुढारी वृत्तसेवा : वडीलधाऱ्यांची शिकवण, संस्कारामुळे आजवर आम्ही संयम बाळगत आलो. परंतु आमच्या दैवतावर हल्ला करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्याला घरात घुसून मारू असा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. ९) बारामतीत दिला.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. यावेळी दगडफेक, चप्पलफेक झाली होती. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी बारामतीत राष्ट्रवादीकडून निषेध सभा झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
काहींनी १२ एप्रिलला बारामतीत गोविंदबाग येथे येत आंदोलनाचा इशारा दिला आहे. या दिवशी राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता गोविंदबाग येथे थांबेल, आंदोलकांना जशास तसे उत्तर देवू असा इशारा तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिला. १२ एप्रिलला कोणी बाहेरच्या व्यक्तीने येवून काही करण्याचा प्रयत्न केला तर आता ज्येष्ठांनी आम्हाला अडवू नये. त्या दिवशी ज्येष्ठांनी घरात बसावे, परंतु आम्हाला प्रत्युत्तर देवू द्या. केवळ निषेध सभा घेवून उपयोग नाही, सोशल मीडियासह सर्व क्षेत्रात पक्षाची भूमिका आता ठामपणे मांडावी लागेल, असे मत युवक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले
संभाजी होळकर, पौर्णिमा तावरे, इम्तियाज शिकीलकर, वनिता बनकर, नितीन शेंडे, सुभाष ढोले, धीरज लालबिगे, शब्बीर शेख, आशिष जगताप, अनिल लडकत, तानाजी कोळेकर, सतीश देशमुख, नरेंद्र गुजराथी, दिलीप ढवाण पाटील, अविनाश गायकवाड, ऋषिकेश गायकवाड, संतोष जाधव, नवनाथ बल्लाळ, कॉंग्रेसचे अँड. अशोक इंगुले व वैभव बुरुंगले तसेच शिवसेनेचे विश्वास मांढरे यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले.
इतक्या दिवस नेत्यांच्या सूचनेनुसार आम्ही शांततेच्या मार्गाने निषेध नोंदविला. आता मात्र बारामतीत येऊन जर कोणी येथील शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्याच भाषेत उत्तर मिळेल. येताना सरळ पायाने याल जाताना मात्र तशी स्थिती राहणार नाही, असा इशारा यावेळी वक्त्यांनी भाषणात दिला.
हेही वाचा