संभाजीराजे छत्रपती : ‘एसटी कर्मचाऱ्यांचे आजचे आंदोलन अशोभनीय, राज्याचे असे संस्कार नाहीत’ | पुढारी

संभाजीराजे छत्रपती : 'एसटी कर्मचाऱ्यांचे आजचे आंदोलन अशोभनीय, राज्याचे असे संस्कार नाहीत'

पुणे, पुढारी वृत्तसेवा :  एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. यासाठी आम्ही त्यांच्या बाजूने आहोत. मात्र, कर्मचाऱ्यांनी आज ज्या पद्धतीने आंदोलन केले ते अशोभनीय असून महाराष्ट्र राज्याची ही संस्कृती नाही, अशा शब्दात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर नाराजी व्यक्त केली.

पुण्यात एका खासगी कार्यक्रमात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिले. एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि.८) दुपारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबई येथील घरावर हल्ला केला. मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या कर्मचाऱ्यांनी येथे घोषणाबाजी करून गोंधळ घातला. याबाबत संभाजीराजे यांना विचारले असता ते म्हणाले, आंदोलन करणे हा सगळ्यांचा अधिकार आहे. परंतु, आंदोलन करताना कायदा हातात घेतला जाऊ नये.

आज एसटी कर्मचाऱ्यांकडून ज्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले ते अशोभनीय आहे. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. राज्याचे असे संस्कार नाहीत. आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होण्याच्या बाजूने आहोत. मात्र, अशा पद्धतीने आंदोलन अशोभनीय आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचलतं का?

Back to top button