बारामती; पुढारी वृत्तसेवा : एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबईत शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर शुक्रवारी केलेल्या हल्ल्यानंतर खबरदारी म्हणून बारामतीमधील गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला.
मुंबईतील सिल्व्हर ओक या जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी अचानक आंदोलन करून दगडफेक,चप्पलफेक हल्ला. खबरदारी म्हणून पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग या निवास्थानासमोर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
या निवासस्थानात सध्या पवार कुटुंबियांपैकी कोणीही राहण्यासाठी नाही. परंतु अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ही खबरदारी घेतली गेल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांनी आज अतिरेक करताना थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराच्या दिशेने मोर्चा वळवला. एसटी कर्मचाऱ्यांनी घरासमोर आंदोलन करताना थेट चप्पल फेकली. त्याचबरोबर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांकडून न्याय देण्याची मागणी करण्यात आली. पोलीस कमी असल्याने आंदोलक थेट बंगल्याबाहेर पोहचले.
पोलिसांची अतिरिक्त कुमक दाखल झाल्यानंतर आंदोलकांनी शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आता ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यानंतर स्कूल बसमधून पोलीसांनी आंदोलकांची आझाद मैदानात रवानगी करत मैदान सील केले आहे.