नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सरत्या आर्थिक वर्षात 27.07 लाख कोटी रुपयांची विक्रमी करवसुली (Tax Collection) झाली असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाकडून शुक्रवारी देण्यात आली. आर्थिक वर्ष 2021-22 साठी सरकारने 22.17 लाख कोटी रुपयांचे करवसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र प्रत्यक्षात 27.07 लाख कोटी रुपयांची करवसुली झाली. उद्दिष्टांपेक्षाही पाच लाख कोटी रुपयांनी जास्त करवसुली झाली आहे. प्रत्यक्ष करवसुली 49 टक्क्यांनी वाढून 12.90 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. दुसरीकडे अप्रत्यक्ष करांतील वाढ 20 टक्क्यांनी जास्त आहे.
गतवर्षीच्या तुलनेत करवसुलीत (Tax Collection) 34 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गतवर्षी 20.27 लाख कोटी रुपयांची वसुली झाली होती. कोरोनाचे संकट नियंत्रणात आल्यानंतर अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळाली. परिणामी करवसुलीत भरीव वाढ झाल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. करवसुलीत वाढ होण्यासाठी संबंधित विभागांनी केलेले प्रयत्नदेखील कामी आले आहेत.
करवसुलीसाठी (Tax Collection) अलिकडील काळात विभागांकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्राचा अवलंब केला जात आहे. सरत्या आर्थिक वर्षात ढोबळ कंपनी कराची वसुली 8.6 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. तत्पूर्वीच्या वर्षात ही वसुली 6.5 लाख कोटी रुपये इतकी होती. दुसरीकडे सरत्या आर्थिक वर्षात आयकर खात्याने 2.24 लाख कोटी रुपयांचा रिफंड केलेला आहे, असे महसूल खात्याचे सचिव तरुण बजाज यांनी सांगितले. जीडीपीच्या तुलनेतील करवसुलीचे प्रमाण 11.7 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. 1999 सालापासूनची ही सर्वाधिक आकडेवारी आहे.