सह्याद्री व्याघ्र प्रकल्प : क्षेत्र संचालकांनी चक्क पुण्याहून सायकलनं कोल्हापूरला येत स्वीकारला पदभार | पुढारी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प : क्षेत्र संचालकांनी चक्क पुण्याहून सायकलनं कोल्हापूरला येत स्वीकारला पदभार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे पूर्वीचे क्षेत्र संचालक समाधान चव्हाण हे प्रशासकीय कारणात्सव त्यांच्या नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले. त्यांच्याकडून वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक म्हणून नानासाहेब लडकत यांनी काल ३१ मार्च रोजी दुपारनंतर पदभार स्वीकारला. कराड येथे नानासाहेब लडकत यांचे स्वागत उपसंचालक उत्तम सावंत, सहाय्यक वनसंरक्षक सुरेश साळुंखे, वनक्षेत्रपाल संदीप कुंभार, बाळकृष्ण हसबनीस यांनी केले.

नानासाहेब लडकत हे महाराष्ट्राच्या वनसेवेत १९८६-८७ च्या बॅचमध्ये रुजू झाले होते. यानंतर त्यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून कामाची सुरूवात केली. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे ते सहाय्यक वनसंरक्षकपदी होते. भारतीय वन सेवेत २००६ साली त्यांना पदोन्नती मिळाली आहे. लडकत यांनी यापूर्वी जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे कोअरचे उपसंचालक म्हणून प्रभावीपणे काम पाहिले आहे. तर कोल्हापूरला पदभार स्वीकारण्यापूर्वी पुण्यात ते वनसंरक्षक म्हणून कार्य करत होते.

नानासाहेब लडकत यांनी कोईमतूर येथे वन्यजीव प्रशिक्षण व भारतीय वन्यजीव संस्थेत वन्यजीव व्यवस्थापनचा पदव्युत्तर डिप्लोमा पूर्ण केला आहे. मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील तथा क्रिएटीव्ह नेचर फ्रेंड्सचे नाना खामकर, हेमंत केंजळे यांनी त्यांचे सह्याद्रीमध्ये स्वागत केले आहे.

पदभार स्वीकारण्यासाठी पुण्याहून सायकलने कोल्हापूरला

विशेष म्हणजे वनसंरक्षक नानासाहेब लडकत भा. व. से. मधील उच्च दर्जाचे अधिकारी आहेत. (सहायक विभागीय कमिशनर दर्जाचे हे पद आहे) दारात सरकारी लाल दिव्याची गाडी आहे पण त्यांना सायकल चालवण्याची आवड आहे. म्हणूनच ते आपला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक या पदाचा पदभार स्वीकारण्यासाठी पुण्याहून सायकल चालवत कोल्हापूर येथे पोहचले हे अतिशय उल्लेखनीय आहे. निसर्गाचे संरक्षण व संवर्धन करा हा संदेश देत ते सायकलवरून कोल्हापूरला आले आहेत. त्यांच्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button