काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका | पुढारी

काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील काँग्रेस नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार दिलीप लांडे यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतरही चांदिवली मतदारसंघातून उमेदवार दिलीप लांडे यांचा उद्धव ठाकरे यांनी प्रचार करीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आमदार लांडे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी नसीम खान यांनी याचिकेतून केली आहे.

तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार दिलीप लांडे यांना न्यायालयाने नोटीस बजावल्या असून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी देखील नसीम खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात यासंबंधी याचिका दाखल केली होती. पंरतु, न्यायालयाने याचिका फेटाळल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. १९ ऑक्टोबर २०१९ ला विधानसभा निवडणुकीचा प्रचार सायंकाळी पाच वाजता थांबला होता. पंरतु, २० ऑक्टोबर २०१९ या दिवशी उद्धव ठाकरे यांनी चांदिवली मतदारसंघात त्यावेळी उमेदवार असलेले दिलीप लांडे यांचा प्रचार केल्याचा आरोप नसीम खान यांनी आपल्या याचिकेत केला आहे. याबाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी या याचिकेतून केली आहे.

खान यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे हे चांदिवली मतदारसंघात येऊन प्रचार करत असतानाचा व्हिडिओ सादर करण्यात आला आहे. तसेच, २० ऑक्टोबरला उद्धव ठाकरे चांदिवली मतदारसंघात आले असल्याचे पोलीस स्टेशन डायरीमध्ये नमूद असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत केवळ ४०९ मतांनी नसीम खान यांचा पराभव झाला होता. काँग्रेस नेते नसीम खान यांच्याकडून खुद्द मुख्यमंत्री यांच्या विरोधात याचिका केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही, असेही नसीम खान यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा  

Back to top button