डिझेल दरवाढीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका : ट्रक्टर मशागतीचे दर भिडले गगनाला! | पुढारी

डिझेल दरवाढीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका : ट्रक्टर मशागतीचे दर भिडले गगनाला!

मुनीर पठाण/औरंगाबाद, पुढारी वृत्‍तसेवा : डिझेलच्या दरात गेल्‍या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. या दरवाढीचा परिणाम शेतीवर मोठया प्रमाणात हाेत आहे. मशागतीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. ट्रॅक्टरने करण्यात येणाऱ्या मशागतीच्या खर्चात जवळपास २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्‍यामूळे इंधन दरवाढीचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तसेच ट्रॅक्टरमुळे तीन दिवसांची कामे आता एका दिवसात होत असली तरी इंधन दरवाढीमुळे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही.

शेतीकामासाठी ट्रॅक्टरचा वापर

सिल्लोड तालुक्यातील अजिंठा, अनाड, मुखपाठ, बाळापूर, पिंपळदरी , शिवणा, अमसरी , खुपटा,धोत्रा, मादणी, गोळेगांव, अंभई, उडणगाव, आदी परिसरात  शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचा मोठया प्रमाणात वापर केला होतो. सध्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर वापर  वाढला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरची संख्या आहे. नांगरणी, वखरणी, मोगडणी करण्यापासून ते पालाकुट्टी करण्यासाठी टॅक्टरचा सर्रास वापर केला जात आहे. इंधन दरवाढीमुळे ट्रक्टरने होण्या-या शेतातील सर्व कामांचे दर वाढविले आहेत. तसेच तालुक्यातील प्रत्येक गावानुसार मशागतीचे दर वेगवेगळे असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला अधिक झळ सोसावी लागत आहे.

वाहतूक झाली खर्चिक

दुसऱ्या बाजूला भाजीपाल्यासह अन्य पिकांना अपेक्षित न मिळणारे दर आणि इंधनवाढीमुळे वाहतूक खर्चिक झाली आहे. गेल्या वर्षी एकरी ७ हजार ते ८ हजार रुपये येणारा खर्च आता १३ हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत वाढली आहे. तसेच, अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती मशागत करणे कठीण झाले आहे. शेतीसाठी उत्पादन खर्च मालाला मिळणारा बाजारभाव व इतर खर्चही पाहणे आवश्यक आहे.  अशा स्थितीत शासनाने शेतीसाठी लागणारे इंधन दरात सवलत व अनुदान देणे गरजेचे आहे.

मागील वर्षाचे दर (प्रति एकर ) : नागरणी : १४००, रोटर मारणे : २२००, वाफे तयार करणे : १०००, सरी पाडणे : १८००,पेरणी . १४००
चालु मशागतीचे दर (प्रति एकर ) नागरणी : १८००, रोटर मारणे : २५००, वाफे तयार करणे : १३००, सरी पाडणे, २००० पेरणी १६०० इतके वाढले आहेत.

Back to top button