सोलापूर : शहरातील स्मशानभूमी होताहेत ‘स्मार्ट’ | पुढारी

सोलापूर : शहरातील स्मशानभूमी होताहेत ‘स्मार्ट’

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा :  ‘स्मार्ट सिटी’ योजनेंतर्गत मूलभूत सुविधांबरोबरच नानाविध योजना राबविल्या जात असल्याने शहराचे रुपडे पालटत आहे. दुसरीकडे स्मशानभूमींचाही विकास होत आहे. चार स्मशानभूमींत गॅस, तर एकामध्ये विद्युतदाहिनी उभारण्यात येणार असल्याने या स्मशानभूमी ‘स्मार्ट’ होणार आहेत.

शहरातील मनपाच्या तसेच खासगी स्मशानभूमींमध्ये अजूनही मृतांवर पारंपरिक पद्धतीने दहनविधी केला जातो. याकरिता लाकडांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. वृक्षतोडीमुळे होणारा पर्यावरणाचा र्‍हास रोखण्यासाठी लाकडांचा वापर कमी करण्याच्यादृष्टीने स्मशानभूमींमध्ये विद्युत अथवा गॅसदाहिनीची सोय करणे गरजेचे आहे.

महापालिकेच्या मोदी तसेच रूपाभवानी येथील स्मशानभूमीत विद्युत दाहिनीची सोय करण्यात आली आहे. अक्कलकोट रोडवरील मनपाच्या स्मशानभूमीत गतवर्षी गॅस दाहिनीची सोय करण्यात आली. कोरोना आपत्तीच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेत कोरोनाने मृत पावलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्युत दाहिनीचा वापर मोठ्या प्रमाणात झाला.

‘स्मार्ट सिटी’ योजनेंतर्गत शहरातील मनपाच्या तसेच खासगी स्मशानभूमींमध्ये विद्युत तसेच गॅस दाहिनीची सोय करण्यात येणार आहे. याअंतर्गत कारंबा नाका, कुमठे, देगाव तसेच पूर्व भागातील पद्मशाली स्मशानभूमीत गॅस दाहिनीची, तर पुणे नाका स्मशानभूमीत विद्युत दाहिनीची सोय करण्यात येणार आहे. सध्या पुणे नाका स्मशानभूमीमध्ये विद्युत दाहिनीसाठी बांधकाम करण्यात येत असून अन्य बाबींच्या पूर्ततेचे काम सुरू आहे. येत्या काही महिन्यांमध्ये पाचही स्मशानभूमींमध्ये गॅस वा विद्युत दाहिनीचे काम पूर्णत्वास येणार आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी लोकांकरिता चांगली सोय होईल.

लाकडांसाठीचा हजारो रुपयांचा खर्च वाचणार

मृतांवर लाकडांनी अंत्यसंस्कार करण्याठी साधारणपणे पाच हजारांपर्यंत खर्च येतो. मात्र विद्युत-गॅस दाहिनीमुळे अवघ्या तीनशे रुपयांमध्ये अंत्यसंस्काराची सुुविधा उपलब्ध झाली आहे. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी विद्युत वा गॅस दाहिनींची मोठी मदत होणार आहे. लोकांची हजारो रुपयांची बचत होणार आहे. लाकडांनी अंत्यसंस्कार करण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी जनप्रबोधन करण्याची गरज आहे.

Back to top button