कधी मेहुणे, कधी जावई तर कधी सासूबाई ! राज्यातील ४ सीएम ‘नाजूक’ नात्यांमुळे अडचणीत आले | पुढारी

कधी मेहुणे, कधी जावई तर कधी सासूबाई ! राज्यातील ४ सीएम 'नाजूक' नात्यांमुळे अडचणीत आले

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस (maharashtra chief minister) या तीन पक्षांचे, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून महाराष्ट्राचे राजकारण कायमच धगधगतं राहिलं आहे. त्यात विरोधी बाकावरील भाजपने खासकरुन विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला सळो की पळो करुन सोडलं आहे. त्यात ईडीच्या मात्रेने महाविकास आघाडीची दमछाक केली आहे. त्यात दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीची धाड पडल्याने मुख्यमंत्री अडचणीत आल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेत्यांना आपल्या नातेवाईकांनी अडचणीत आणले आहे. अनेक नेत्यांना या अडचणीमुळे आपल्या पदाचा देखिल राजीनामा द्यावा लागला आहे. नातेवाईकांमुळे अडचणीत आलेल्या नेत्यांची यादी करायची वेळ आली तर कदाचीत ती हनुमानाच्या शेपटी एवढी लांबत जाईल. त्यापेक्षा कोणकोणते मुख्यमंत्री आपल्या नातेवाईकांमुळे अडचणीत आले ते आपण पाहू…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (maharashtra chief minister) यांच्या मेहुण्यांवर ईडीची कारवाई झाल्याने उद्धव ठाकरे आता पुन्हा विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. त्यामुळे सध्या मुख्यमंत्री चांगलेच अडचणीत सापडले आहेत असे बोलले जात आहे. पण, आपल्या नातेवाईकांमुळे अडचणीत सापडलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही पहिले मुख्यमंत्री नाहीत. तर या आधी काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे त्यांच्या सासूबाईंमुळे तर माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे आपल्या जावयामुळे आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे आपल्या मुलामुळे अडचणीत आले होते.

उद्धव ठाकरे

सध्या पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या मेहुण्यांमुळे अडचणीत येण्याची शक्यता वाढली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. त्याचे ११ प्लॅट ईडीने जप्त केली आहे. तर त्यांच्याशी संबधीत पुष्पक ग्रुपची तब्बल ६.४५ कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. या प्रकरणात विरोधकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चांगलेच घेरले आहे. आता मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागतो का हे पहावे लागेल.

मनोहर जोशी

१९९६ नंतर महाराष्ट्रात शिवसेना व भाजप या युतीचे सरकार आले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचे निकटवर्ती व निष्ठावान नेते मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री केले. जोशी यांच्या नेतृत्त्वाखाली युतीचे सरकार महाराष्ट्रात चांगली कामगिरी करत होते. त्या काळात मनोहर जोशी हे शिस्तीचे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जात होते. पण, या शिस्तीच्या राजकारणात नेमकं नातेसंबध अडवे आले.

मुख्यमंत्री मनोरहर जोशी यांच्यावर १९९८ साली आरोप झाले की त्यांनी त्यांचे जावई गिरीश व्यास यांना पुण्यातील शाळेचा आरक्षित भूखंड दिला. त्यावर एक १० मजली इमारत देखिल बांधण्यात आली. शेवटी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयात सिद्ध झालं की मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी त्यांच्या पदाचा वापर करत पुण्यातील एका शोळेच्या नावे असलेला भूखंडाचे आरक्षण उठवून ती जमीन जावयाला दिली. या सर्वप्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर खूप टिका झाली. शेवटी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांचा राजीनामा घेतला व नारायण राणे यांना मुख्यमंत्री करण्यात आले.

विलासराव देशमुख

काँग्रेसचे दिग्गज नेते विलासराव देशमुख सुद्धा महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे नेते होते. तसेच त्यांचा कार्यकाळ हा विकासाचा, प्रगतीचा तसेच स्थिरतेचा मानला जातो. जेव्हा जेव्हा काँग्रेसला गरज होती तेव्हा विलासराव देशमुख हे नेहमी पक्षासाठी धावून येत असत. महाराष्ट्रात आघाडीचे सरकार यशस्वी करण्याचा फॉम्युला खरे तर त्यांनी दिला. पण, या येवढ्या मोठ्या नेत्याला देखिल पुत्र प्रेमापोटी आपलं मुख्यमंत्रिपदाचा त्याग करावा लागला होता.

त्याचे घडलं असं, की २००८ साली मुंबईत मोठा दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी प्रसिद्ध ताज हॉटेल दहतवाद्यांनी ताब्यात घेतले होते. या घटनेत ताज हॉटेलचे मोठे नुकसान झाले. या घटनेची पाहणी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांच्या ताफ्यात बिगर सरकारी दोन व्यक्तींचा समावेश होता. त्या दोन व्यक्ती म्हणजे त्यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुख आणि दिग्दर्शक रामगोपाल वर्मा. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याचे फोटो सगळीकडे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि एक हलकल्लोळ माजला. रितेश देशमुख आणि रामगोपाल वर्मा यांना मुख्यमंत्र्या सोबत पाहून हा दौरा म्हणजे पर्यटन दौरा होता का अशी टिका विलासराव देशमुख यांच्यावर करण्यात आली.

या घटनेत तेल ओतले म्हणजे तत्कालीन गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांनी. या घटनेची जबाबदारी स्वीकारत व नैतिक जबाबदारी म्हणून गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी आपला राजीनामा दिला. पुढे विलाराव देशमुख यांच्यावर देखिल राजीनाम्यासाठी दबाव निर्माण करण्यात आले. अखेर विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या राजीनाम्या मागे अनेक कारणे होती. पण, तात्कालिक कारण ठरले ते त्यांच्या मुलाचे.

अशोक चव्हाण

२००८ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राजीनामा दिला. काँग्रेसचे मोठे नेते अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री झाले. २००९ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने विधानसभा निवडणूक जिंकली व पुन्हा अशोक चव्हाण मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. पण, हे मुख्यमंत्री पद त्यांना फार काळ उपभोगता आले नाही. २०१० मध्ये आदर्श घोटाळा समोर आला आणि महाराष्ट्रात मोठे राजकीय वादळ उठले. मुंबईतील कुलाबा परिसरात लष्काराच्या आरक्षित जमीनीवर रहिवासी इमारत उभी करण्यात आली आणि इमारतीचा म्हणजे आदर्श सोसायटीच्या फाईल्सला परवानगी देण्यासाठी तेथील तीन प्लॅट अशोक चव्हाण यांनी बेनामी आपल्या नावावर केल्या आहेत असा आरोप झाला. तसेच हे फ्लॅट त्यांच्या सासू भगवती शर्मा आणि सासरे मदनलाल शर्मा यांच्या नावावर असल्याचे उघड झाले. या प्रकरणात अशोक चव्हाण यांच्यावर मोठी टिका झाली आणि त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

Back to top button