ED : “एक दिवस यांना स्मशानात जावं लागेल”, संजय राऊतांची भाजपावर टीका | पुढारी

ED : "एक दिवस यांना स्मशानात जावं लागेल", संजय राऊतांची भाजपावर टीका

नागपूर, पुढारी ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या संपत्तीवर ईडीची (ED) कारवाई झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. यावर सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका केली जात आहे. यामध्ये शरद पवार, जितेंद्र आव्हाड, नाना पटोले, आदित्य ठाकरे अशा अनेक नेत्यांनी भाजपावर टीका केली आहे. त्यात संजय राऊत यांनी, “शिवसंवाद यात्रेला मिळत असलेल्या मोठ्या प्रतिसादामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे”, असं म्हटले आहे.

शिवसंवाद यात्रेसाठी संजय राऊत सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. तिथे बोलताना त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “काल सकाळपासून शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाल्याबरोबर दुपारी ईडीनं कारवाई सुरू केली आणि लोकांचं लक्ष तिकडे वळवायला सुरुवात केली. मालमत्ता जप्त करण्याआधी त्यांना बोलवायला हवं होतं. या कारवाईचं भाजपाकडून समर्थन केलं जात आहे. ही हुकुमशाहीची नांदी आहे”, असंही मत संजय राऊत यांनी मांडले.

“यांच्या कारवायांमुळे (ED) सरकार अस्थिर होत नाही. उलट ज्या काही फटी होत्या, त्या बुजल्या गेल्या. यामुळे तीन पक्ष इतके एकत्र आले, की आता हे तुटणं शक्य नाही. एक दिवस यांना स्मशानात जावं लागेल. यांची हाडं राजकीय स्मशानात रचली गेली आहेत. जे करतायत, त्यांनी हे लक्षात ठेवावं की यांची लाकडं रचली गेली आहेत. त्यांना राजकारणातून कायमचं हे राम म्हणावं लागेल”, अशा शब्दांत राऊतांनी टीका केली आहे.

राऊत पुढे म्हणाले की, “सोमय्याांच्या बोलण्याला कोण विचारतंय? ते काहीही बोलतात. त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. हवाला किंगचे भाजपाच्या लोकांशी संबंध असल्याचे पुरावे मी पंतप्रधान कार्यालयाला दिले आहेत. पण त्यावर ईडी कारवाई करत नाहीये. किरीट सोमय्यांना आजपर्यंत अनेकदा भाजपाच्या अनेक नेत्यांच्या घोटाळ्यांची माहिती दिली आहे. पण त्यांच्या तोंडातून शब्द निघालेला नाही. त्यांनी ज्या नेत्यांच्याविरोधात ईडीच्या कारवाईची मागणी केली, ते सगळे लोक नंतर भाजपात गेले. त्यानंतर या महाशयांची वाचा गेली. मग यांच्यावर काय विश्वास ठेवताय? सोडून द्या”,अशी टीका संजय राऊतांनी भाजपा नेते किरीय सोमय्यांवर केली आहे.

Back to top button