नाशिक : ‘त्या’ उपोषणाची अखेर दखल; घरपट्टी, पाणीपट्टी माफीसंदर्भात समिती गठीत | पुढारी

नाशिक : 'त्या' उपोषणाची अखेर दखल; घरपट्टी, पाणीपट्टी माफीसंदर्भात समिती गठीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; घरपट्टी व पाणीपट्टी माफीसंदर्भात आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते स्वप्नील घिया हे उपोषणाला बसले होते. त्यांच्या आंदोलनाची दखल घेत मनपा प्रशासक कैलास जाधव यांनी घरपट्टी, पाणीपट्टी माफ करण्यासंदर्भात समिती नियुक्त केली असून, ही समिती या प्रकरणी अहवाल सादर करणार आहे.

घरपट्टी आणि पाणीपट्टी हे महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. याच प्रमुख उत्पन्नाचे मार्ग बंद करण्याच्या दृष्टीने घिया यांनी उपोषण करत माफ करण्याची मागणी केली होती. याबाबत नियुक्त केलेल्या समितीबाबत आम आदमी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अ‍ॅड. अभिजित गोसावी यांना कळविण्यात आले आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमात मालमत्ता कर व पाणीपट्टी माफ करण्यासंदर्भात तरतूद नाही. कर नियमन करण्याचे अधिकार राज्य शासनाचे आहे.

समितीमध्ये अतिरिक्त आयुक्त, कर उपआयुक्त, मुख्य लेखाधिकारी व मुख्य लेखापरीक्षक, महापालिका कायदे सल्लागार व सनदी लेखापाल यांचा समावेश आहे. ही समिती अभ्यास करून अहवाल आयुक्तांकडे सादर करणार आहे. समितीच्या अहवालानुसार महासभा अस्तित्वात आल्यानंतर प्रस्ताव महासभेवर सादर केला जाईल. महासभेच्या निर्णयानुसार शासनाच्या अधिकारात निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

Back to top button