Holi 2022 : अनिष्ट ज्वलनाची होळी | पुढारी

Holi 2022 : अनिष्ट ज्वलनाची होळी

होळीला अग्नी प्रज्वलित करून नव्यानेच आलेले धान्य त्यात भाजण्याची पद्धत रूढ आहे. होळी च्या आगीत अनिष्ट गोष्टी जळून जातात, दुःखे नाहिशी होतात आणि रंगांमध्ये भरलेला आनंद जीवनात उतरतो, अशी होळीच्या सणाची महती आहे.

उत्तर भारतातील गावांत अर्धेकच्चे धान्य आगीत भाजून खाण्याचा रिवाज आहे. त्या धान्याला ‘होला’ असे म्हटले जाते. जाणकार असे सांगतात की, नवधान्य सस्येष्टीचा हा सण आहे. या शब्दाचा अर्थ ‘नवे धान्य किंवा पिकाचे हवन’ असा आहे. वैदिक काळात याला ‘नवान्नसस्येष्टी यज्ञ’ असे म्हटले जात असे. नव्याने तयार झालेले कच्चे धान्य यज्ञात दान करून प्रसाद म्हणून ग्रहण केले जात असे. याच धान्याला ‘होला’ असे म्हटले जात असल्यामुळे या सणाला ‘होलिकोत्सव’ असे नाव दिल्याचे सांगितले जाते. आता मात्र हा पूर्णपणे रंगांचा सण होऊन गेला आहे.

नव्या पिकाच्या आनंदाबरोबरच वसंताच्या आगमनाचेही निदर्शक म्हणजे होळी. फाल्गुन हा वर्षाचा शेवटचा महिना आहे आणि नव्या वर्षाची, नव्या पालवीची चाहूल याच महिन्यात लागते. त्यामुळेच होळीचे एक प्रचलित नाव ‘फाल्गुनी’ हेही आहे. काही इतिहासकारांच्या मते, आर्यांच्या आगमनापूर्वी भारतात हा सण साजरा केला जात होता; परंतु तो विशेषत्वाने भारताच्या पूर्व भागात साजरा होत असे. जैमिनीच्या पूर्वमीमांसा सूत्रात आणि कथाग्राह्य सूत्रात होलिकेचा उल्लेख आढळतो.

होळीच्या अनेक अंतर्कथा आहेत. सर्वांत प्रसिद्ध आणि जुनी कहाणी प्रल्हादाची आहे. असे म्हणतात की, हिरण्यकश्यपू नावाचा आसुर स्वतःला ईश्वर मानू लागला. त्याचा पुत्र प्रल्हाद विष्णू नावाच्या देवाची आराधना करतो, हे समजल्यावर त्याला राग आला. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मारण्यासाठी बहिणीची, म्हणजे होलिकेची मदत घेतली. होलिकेला शंकराकडून वरदान प्राप्त झाले होते. तिला अशी चादर मिळाली होती, जी पांघरताच अग्नी संबंधित व्यक्तीला जाळू शकणार नाही. होलिकेने ती चादर पांघरून प्रल्हादाला मांडीवर घेतले आणि आगीत जाऊन बसली.

परंतु, ती चादर तिच्या अंगावरून निसटून प्रल्हादाच्या अंगावर येऊन पडली आणि प्रल्हादाऐवजी होलिका जळून गेली. ईश्वरभक्त प्रल्हादाच्या स्मृतिप्रीत्यर्थ या दिवशी होळी पेटविली जाते. छळ आणि अत्याचाराचे प्रतीक असणारी होळी जळते आणि प्रेमाचे प्रतीक असणारा प्रल्हाद म्हणजे आनंद अक्षय्य राहतो. श्रीकृष्णाने या दिवशी पुतना नामक राक्षसीचा वध केला होता, असेही मानले जाते. याच आनंदात गोप-गोपिकांनी रासलीला आणि रंग खेळला होता.

होळीच्या पर्वाच्या पहिल्या दिवशी होळी पेटविली जाते. होळीत आणखीही काही पदार्थ जाळण्याचा प्रघात आहे. गायीच्या शेणापासून केलेल्या गोवर्‍यांच्या मध्यभागी छिद्रांमधून दोरी ओवून माला तयार केली जाते. होळी पेटविल्यानंतर बहिणी ही माला भावांवरून ओवाळून आगीत टाकतात. भावांवर पडू शकणार्‍या वाईट नजरेपासून त्यांचे रक्षण व्हावे, अशी भावना यातून व्यक्त केली जाते. सायंकाळी होळी पेटविली जाते. नव्याने आलेले पीक, विशेषतः गहू आणि हरभरा त्यात भाजला जातो. होळीचे दहन हे समाजातील सर्व वाईट वृत्तींचे दहन मानले जाते.

दुसर्‍या दिवशी गुलाल आणि रंगांच्या साह्याने होळी खेळली जाते. ब्रजभूमीतील होळी तर जगप्रसिद्ध आहे. पुरुष महिलांवर रंग उडवितात, तर महिला लाठ्या आणि कापडाच्या साह्याने तयार केलेल्या चाबकाने पुरुषांना मारतात. मथुरा आणि वृंदावन येथे पंधरा दिवस होळी उत्सव रंगतो. वृंदावन येथे विधवा महिला मंदिरांत देवाबरोबर रंग खेळतात. श्रीकृष्णाबरोबर या महिला फुलांची होळी खेळतात. दक्षिण गुजरातमधील आदिवासीबहुल भागातसुद्धा होळी हाच महत्त्वाचा सण मानला जातो.

छत्तीसगडमध्ये होळीला खास लोकगीते गायिली जातात. मध्य प्रदेशातील माळवा प्रांतातील भगोरिया या आदिवासी भागात तसेच बिहारमधील फगुआमध्ये लोक होळीचा रंग धारण करून आनंदात नाचतात. परदेशातील लोकांनाही या सणाची गोडी लागली आहे. आपले हे सांस्कृतिक वैभव आज जगभरात पोहोचले आहे.

– सु. ल. हिंगणे

Back to top button