Hemant soren : हेमंत सोरेन यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली, पण ‘यासाठी’ दिली परवानगी | पुढारी

Hemant soren : हेमंत सोरेन यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली, पण 'यासाठी' दिली परवानगी

पुढारी ऑनलाईन डेस्क : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना झारखंड उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला. सोरेन यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. उच्च न्यायालयाचे कार्यवाह न्यायाधीश आणि न्यायमूर्ती नवनीत कुमार यांच्या खंडपीठाने सुनावणी पूर्ण झाल्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर आज (दि.३) झारखंड उच्च न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान सोरेन यांची अटकेविरोधातील याचिका आज फेटाळली. (Hemant soren)

Hemant soren : काकांच्या श्राद्धाला पोलीस बंदोबस्तात उपस्थित राहण्याची परवानगी

हेमंत सोरेन यांनी त्यांच्या काकांच्या श्राद्धाला उपस्थित राहण्यासाठी एक दिवसाचा तात्पुरता जामीन मागितला होता. न्यायालयाने सोरेन यांची जामीन याचिका फेटाळून लावली. मात्र, त्यांना दिलासा देत पोलीस बंदोबस्तात कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, या काळात ते माध्यमांशी बोलणार नाहीत, अशा सूचना न्यायालयाने हेमंत सोरेन यांना दिली आहे. (Hemant soren)

अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर झटका

याशिवाय अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरही सोरेन यांना झटका बसला आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्याच्या अटकेला आव्हान देणारी फौजदारी रिट याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. 28 फेब्रुवारी रोजी सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता आणि आज निर्णय जाहीर केला. (Hemant soren)

ईडी ज्या जमिनीबद्दल बोलत आहे ती त्यांच्या नावावर कधीच नव्हती- हेमंत सोरेन

सोरेन यांच्या वतीने देशाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि उच्च न्यायालयाचे वकील पियुष चित्रेश यांनी युक्तिवाद केला. ईडीच्या वतीने एसव्ही राजू आणि अमित दास यांनी युक्तिवाद केला. हेमंत सोरेन यांनी आपल्या अटकेला आव्हान देणारी याचिका झारखंड उच्च न्यायालयात दाखल केली होती. सोरेन म्हणाले की, त्यांच्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा मनी लाँड्रिंगचा नाही. ईडी ज्या जमिनीबद्दल बोलत आहे ती जमीन कधीच त्यांच्या नावावर नव्हती. आदेश राखून ठेवल्यानंतरही निर्णय सुनावला जात नसल्याच्या विरोधात सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर सर्वोच्च न्यायालयाने ईडीकडून उत्तर मागितले आहे.

Back to top button