एक मिलिमीटरचा किडाही घेऊ शकतो गुंतागुंतीचा निर्णय | पुढारी

एक मिलिमीटरचा किडाही घेऊ शकतो गुंतागुंतीचा निर्णय

लंडन : अनेक लोकांना योग्यवेळी निर्णय घेण्याची क्षमता नसते. मानवाला सक्षम मेंदूची देणगी मिळालेली असूनही अनेक लोक निर्णय घेताना गोंधळतात. मात्र, अवघ्या एक मिलिमीटर लांबीच्या आणि केवळ 300 चेतापेशी असलेल्या किड्यामध्ये गुंतागुंतीच्या स्थितीत निर्णय घेण्याची क्षमता असल्याचे दिसून आले आहे.

या किड्यामध्ये मेंदूच्या केवळ 300 पेशीच असल्या तरी तो आणीबाणीवेळी प्रसंगावधान राखून योग्य निर्णय घेऊ शकतो. या अपृष्ठवंशीय जीवामध्ये परिस्थितीनुसार असे ‘स्मार्ट’ निर्णय घेण्याची क्षमता असल्याचे त्याच्या अनेक प्रकारच्या वर्तनांमधून दिसून आले आहे.

माणसापेक्षा 285 दशलक्ष पटीने कमी चेतापेशी असलेल्या या जीवामधील ही निर्णयक्षमता थक्‍क करणारीच आहे. माणसामध्ये 86 अब्ज चेतापेशी असतात हे विशेष! या किड्याचे वैज्ञानिक नाव ‘प्रिस्टिओंचस पॅसिफिकस’ असे आहे. वेगवेगळ्या जीवाणूंना ते आपले भक्ष्य बनवत असतात. अन्‍न मिळवण्याच्या प्रक्रियेवेळी ते आपल्या प्रतिस्पर्ध्याला एक तर इशारा देतात किंवा चाणाक्षपणे मारून टाकतात.

 

Back to top button