कोल्हापूर : ‘सर्व्हर डाऊन’मुळे हजारो लोकांना फटका | पुढारी

कोल्हापूर : ‘सर्व्हर डाऊन’मुळे हजारो लोकांना फटका

कोल्हापूर : सुरेश पवार
सरकारी कामकाज गतिमान करण्याची निव्वळ चर्चाच सुरू असून, गेल्या अनेक दिवसांपासून सर्व्हर डाऊनचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याचा फटका राज्यातील हजारो ग्राहकांना बसत असून, सर्वच विभागांचे कामकाजही कोलमडले आहे. विशेषत:, महसूल विभागाशी संबंधित कामे, शेतकर्‍यांचे सात-बारा उतारे, दस्तऐवज नोंदणी आणि मुद्रांक विभागातील कामे रखडली असून, ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. मार्च एंडिंगमुळे या वर्षातील कामे पूर्ण करण्याची घाई सुरू असून, लॉगिनची संख्या वाढल्याने याचा ताण संगणक प्रणालीवर येत आहे.

सध्याचे युग डिजिटल युग आहे आणि डिजिटलशिवाय आता पर्यायही राहिला नाही. प्रशासनात डिजिटल प्रणाली आणण्यात महाराष्ट्र सरकार आघाडीवर आहे. तीन वर्षांपूर्वीच दस्तऐवज नोंदणी डिजिटल प्रणालीने होऊ लागली आणि मालमत्ता पत्रकापासून जमिनीच्या सात-बारापर्यंतचे उतारे ऑनलाईन मिळू लागले. पूर्वी होणार्‍या चुका आणि गैरव्यवहार यांना आळा बसला. डिजिटल प्रणालीचे स्वागतच झाले आहे. तथापि, ‘सर्व्हर डाऊन’ची समस्या ही आता या प्रणालीतील मोठा अडथळा ठरू पाहत आहे आणि ‘सर्व्हर डाऊन, ग्राहक गेले कावून’ अशी परिस्थिती आता निर्माण होऊ लागली आहे.

18 एप्रिल 2019 पासून आजतागायत म्हणजे सुमारे तीन वर्षांत महाभूमीलेख संकेतस्थळाला 24 कोटी 39 लाख 27 हजार 907 जणांनी भेट दिली आहे. सात-बारा उतार्‍यासाठी 24 कोटी 22 लाख 98 हजार 875 लोकांनी संकेतस्थळ पाहिले आहे. म्हणजे दरवर्षी आठ कोटींपेक्षा अधिक लोकांनी हे संकेतस्थळ पाहिले आहे. ही संख्या लक्षणीय आहे. 8 अ साठी 5 कोटी 34 लाख 2 हजार 991 आणि मालमत्तापत्रक म्हणजे प्रॉपर्टी कार्डासाठी 7 लाख 43 हजार 558 जणांनी या संकेतस्थळाला भेट दिली आहे. बुधवार, दि. 16 मार्च या एका दिवसात सायंकाळी पावणेपाच वाजेपर्यंत 76,587 जणांनी सात-बारासाठी 15 हजार 820 जणांनी 8 अ साठी आणि 3,029 जणांनी प्रॉपर्टी कार्डासाठी या संकेतस्थळाला भेट दिली होती.

ही आकडेवारी लक्षात घेता शहरीच नव्हे, तर ग्रामीण भागही डिजिटल साक्षर होत आहे, ही अभिमानाचीच बाब आहे. तथापि, डिजिटल यंत्रणा वापरात येत असताना निर्माण होणार्‍या अडचणी डिजिटल प्रक्रियेच्या विस्ताराला अडथळा ठरू पाहत आहेत.
या सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे सर्व्हर डाऊन! सर्व वेबसाईट या मुंबईतील मुख्य सर्व्हरशी जोडलेल्या आहेत. संपूर्ण राज्यासाठी हे एकच सर्व्हर आहे. त्याची क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे संकेतस्थळावर गर्दी झाली की, या सर्व्हरवरील लोड वाढतो आणि सर्व्हर बंद पडतो.

दस्त नोंदणी करणार्‍या मुद्रांक नोंदणी कार्यालयापासून प्रॉपर्टी कार्ड देणार्‍या नगरभूमापन कार्यालयापर्यंत सात-बारा, आठ अ पत्रक देणार्‍या महसूल कार्यालयापर्यंत सर्वत्र सर्व्हर डाऊनचा अडथळा वारंवार येतो, असा ग्राहकांचा अनुभव आहे. दस्त नोंदणी किंवा अन्य कागदपत्रांसाठी, उतार्‍यासाठी लोकांना कधी कधी दिवसभर तिष्ठावे लागते. यातून काही वेळा वादावादीचे प्रसंगही उद्भवतात.
महत्त्वाचे दस्तऐवज शेतजमिनीचे सात-बारा उतारे, 8 अ दस्तऐवज, मालमत्तापत्रक म्हणजे प्रॉपर्टी कार्ड आणि दस्तऐवज तसेच खरेदीपत्र करारासह नोंदणी करणे अत्यावश्यक असलेले दस्त हे सर्वसामान्यांच्या द‍ृष्टीने महत्त्वाचे आणि मोलाचे दस्तऐवज! त्यासाठी महसूल कचेर्‍या, नगरभूमापन कार्यालये, मुद्रांक नोंदणी कार्यालये येथे नेहमी गर्दी असते. वर्षअखेरीच्या मार्च महिन्यात त्यात भरच पडते. हे दस्तऐवज झटपट मिळावेत, यासाठीच डिजिटल यंत्रणा उभी करण्यात आली. तथापि, दस्तऐवज त्वरित मिळाला, असा सुखद अनुभव अपवादानेच मिळतो.

‘सर्व्हर डाऊन’ची दिरंगाई भोवते

एखादा खरेदी कराराचा दस्त सर्व्हर डाऊन झाल्याने वेळेत नोंद होऊ शकला नाही, तर संबंधित व्यक्‍तीचे नुकसानही होऊ शकते. न्यायालयीन कामकाजासाठी वेळेत कागदपत्रे उपलब्ध झाली नाहीत, तर संबंधितांची तारांबळ उडते. अनेकांना असा अनुभव घ्यावा लागला आहे.

हेही वाचलत का ?

 

Back to top button