ग्रीनलँडमध्ये झाली होती लघुग्रहाची धडक | पुढारी

ग्रीनलँडमध्ये झाली होती लघुग्रहाची धडक

लंडन : पृथ्वीला वेळोवेळी लघुग्रह, उल्का यांची धडकही झालेली आहे. अशाच एका लघुग्रहाच्या धडकेने पृथ्वीवरून डायनासोर व अन्य काही प्रजाती नष्ट झाल्या होत्या. आता ग्रीनलँडमध्येही एका लघुग्रहाची धडक झाली होती याचे पुरावे समोर आले आहेत. 5 कोटी 80 लाख वर्षांपूर्वी या लघुग्रहाची धडक झाली होती व त्यामुळे तिथे एक विवरही तयार झाले होते. हे विवर बर्फाखाली झाकले गेल्याने त्याची माहिती समोर आली नव्हती.
ग्रीनलँडच्या वायव्य भागातील या विवराचे नाव ‘हियावाथा क्रेटर’ असे आहे. हे विवर तब्बल एक किलोमीटर जाडीच्या बर्फाखाली दबले गेलेले आहे. ‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. काही प्रारंभिक संशोधनांमध्ये हे विवर 13 हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे म्हटले गेले होते. मात्र, नव्या संशोधनानुसार हे विवर तब्बल 5 कोटी 80 लाख वर्षांपूर्वीचे असल्याचे आढळले आहे. त्यावेळी ग्रीनलँड सध्यासारखे बर्फाच्छादीत नव्हते. हा भूभाग त्यावेळी हिरवागार आणि जैवविविधतेने नटलेला होता. डेन्मार्कच्या नॅशनल हिस्टरी म्युझियमच्या मायकल स्टोरे यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की त्या काळात ग्रीनलँड हे वर्षावनाने नटलेले होते.

त्यावेळी सुमारे दीड किलोमीटर व्यासाच्या एका लघुग्रहाची या भागाला धडक बसली. त्यामुळे स्थानिक भागात भूकंपाचे धक्के बसले आणि वणवे पेटले. मात्र, या घटनेचा जागतिक हवामानावर परिणाम झाल्याचे पुरावे आढळले नाहीत.
या धडकेमुळे निर्माण झालेल्या विवराचा छडा विमानावर बसवलेल्या ‘आईस-पेनीट्रेटिंग रडार’ म्हणजेच बर्फाला भेदून खाली जाणार्‍या रडार यंत्रणेद्वारे लावण्यात आला.

Back to top button