मानेचे दुखणे होण्याची कारणे आणि त्यावर काय आहेत उपाय? | पुढारी

मानेचे दुखणे होण्याची कारणे आणि त्यावर काय आहेत उपाय?

शहरी जीवनाचा भाग म्हणून अनेकांना मानेचे दुखणे कायमचे मागे लागलेले दिसते. दिवसभर व्यस्त कार्यक्रमात प्रचंड वाहतुकीतून, खड्ड्यांच्या रस्त्यातून मार्ग काढताना आपल्या मान आणि कंबरेच्या आरोग्यावर हळूहळू पण निश्चित असा परिणाम होत असतो हे आपल्याला कधी लक्षातच येत नाही. जेव्हा ही गोष्ट लक्षात येते तेव्हा मानेचे आणि कंबरेचे दुखणे हाताबाहेर गेलेले असते. मान हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळेच मानेचे आरोग्य व्यवस्थित राहणे आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्याच्या द़ृष्टीने महत्त्वाचे असते. मानेचे आरोग्य बिघडले की त्याचा परिणाम शरीराच्या अन्य भागांवर होत असतो. म्हणूनच मानेच्या दुखण्याची माहिती कळाल्यावर या दुखण्यावर तातडीने उपचार करून घेणे योग्य असते.

मानेचे दुखणे होण्याची अनेक कारणे आहेत. वाहन आणि रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मानेला हिसके बसतात. त्याचबरोबर योग्य पद्धतीने न बसल्यामुळेही मानेचे दुखणे उद्भवते. बराच वेळ मान वर करून पाहणे आणि दीर्घ काळ मान खाली घालून बसणे अशा कारणांमुळेही मानेचे दुखणे मागे लागते. मानेचे आरोग्य संपूर्ण शरीराच्या आरोग्याच्या द़ृष्टीने किती महत्त्वाचे आहे याची आपल्याला कल्पनाच नसते. त्यामुळे आपण मानेकडे हवे तेवढे लक्ष देत नाही.

नोकरदारांना संगणकावर बसून मान खाली घालून सातत्याने काम करावे लागते. त्याचाही परिणाम मानेचे आरोग्य बिघडण्यात होतो. यामुळे आपल्या संगणकासमोर बसताना मानेच्या आरोग्याला बाधा पोहोचणार नाही अशाच पद्धतीने संगणकाकडे पाहिले पाहिजे. यासाठी तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घेऊन आपली आसन रचना करावी. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानेला काही वेळ आराम दिला पाहिजे. मानेमधील पेशी मजबूत होण्यासाठी दररोज मानेचे व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे.

मानेला आराम देणे हा या संदर्भातील कोणत्याही व्याधीवरचा रामबाण उपचार आहे. मान दुखू लागली किंवा मान अवघडली की समजावे मानेचे आरोग्य बिघडले आहे. अशावेळी डॉक्टरकडे जाणे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेणे हा सर्वात चांगला मार्ग आहे. मानेच्या पट्ट्यामुळे मानेला चांगला आराम मिळतो.

मानेचे दुखणे अधिक वाढले तर ऑर्थोपेडिक डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते. डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घेतली पाहिजेत. औषधे घेण्यात हलगर्जीपणा केल्यास दुखणे लवकर बरे होत नाही. मान खूपच दुखू लागली तर औषध, गोळ्या घेण्याशिवाय पर्याय नसतो. मानेला गरम शेक देणे हाही चांगला उपाय आहे. गरम शेक दिल्यामुळे मानेमधील आखडलेले स्नायू मोकळे होतात. यासाठी गरम पाण्यात एक टॉवेल बुडवून घ्यावा, तो किंचितसा पिळून घ्यावा आणि मानेला चहूबाजूने बांधावा. गरम पाण्यात अंघोळ करण्यानेही मानेच्या दुखण्यात आराम मिळू शकतो. अनेकदा आपण वापरत असलेली उशी मानेच्या दुखण्याचे कारण ठरू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे आपल्याला उशीही बदलावी लागते.

तेलाने मानेला मालीश करण्यानेही आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते. खोबरेल तेलाचा वापर करून मानेला मसाज केल्याने आखडलेेले स्नायू मोकळे होतात. अनेकदा मऊ उशीमुळेही मानेचे दुखणे उद्भवते. यासाठी फक्त मानेला आधार देणारी कापडाची गुंडाळी वापरावी. ती गुंडाळी मानेखाली ठेऊन डोके खाली जाईल अशा पद्धतीने झोपावे. या पद्धतीने दुखर्‍या मानेला चांगलाच आराम मिळतो. आपले दुखणे कोणत्या प्रकारचे आहे, यावर कोणते उपचार करायचे हे अवलंबून असते.

बराच काळ खाली पाहून लिहिल्यामुळेही मानेचे दुखणे पाठीमागे लागते. यासाठी पूर्वी ज्या डेस्कचा वापर केला जायचा तशा पद्धतीचे डेस्क आणून लिहिण्याचा सराव करा.

मनावर सतत तणाव असल्याने तसेच वयोमानानुसारही मानेची दुखणी निर्माण होतात. मानेची दुखणी त्वरेने बरी होत नाहीत. यासाठी दीर्घकाळ उपचार करावा लागतो. डॉक्टरांकडून उपचार घेतले म्हणजे लगेच गुण येतो असेही नाही. मानेचे दुखणे चिवट आहे. त्यामुळे न कंटाळता उपचार करत राहणे गरजेचे आहे. आपल्या व्याधीचे नेमके कारण जाणून घेऊन त्याप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यायला हवेत. सातत्याने वेदनाशामक गोळ्या घेऊन दुखण्यापासून तात्पुरता आराम मिळतो. मात्र वेदनाशामक गोळ्यांचे शरीरावर अन्य परिणामही होत असतात. म्हणूनच योग्य उपचार घेण्याकडे लक्ष द्यावे.

डॉक्टरांकडून घ्यावयाच्या उपचारासाठी लागणार्‍या खर्चाची काळजी करत अनेकजण हे दुखणे अंगावर काढतात. अशी चूक करणे तुम्हाला चांगलेच महागात पडेल. कारण मानेचे दुखणे वाढल्यावर त्यावर उपचार करण्यासाठी पुढे बराच खर्च येतो. सध्याचा वैद्यकीय उपचारांचा वाढलेला खर्च लक्षात घेता दुखण्याला (व्याधीला) जेव्हा सुरुवात होते त्यावेळीच उपचार चालू केले तर पुढचा त्रास आणि खर्च वाचतो.

मानेसाठी करावयाचे काही व्यायाम : मांडी घालून बसा किंवा उभे रहा. दोन्ही हात डोक्यावर ठेऊन मान पूर्णपणे सैल सोडा. मान अनुक्रमे डाव्या आणि उजव्या बाजूला क्रमाक्रमाने खालच्या बाजूला आरामदायी स्थितीत सोडा. त्याचबरोबर मान संपूर्णपणे उजव्या व डाव्या बाजूला क्रमाक्रमाने वळवत राहण्याचा व्यायामही उपयुक्त ठरतो. हा व्यायाम दिवसातून 5 ते 10 वेळा करा. हा व्यायाम केल्याने मानेतील स्नायूंना आराम मिळतो. मानेवर अंघोळ करताना गरम पाण्याची धार सोडण्यामुळेही मानेतील आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते. हे सर्व उपचार किंवा व्यायाम डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावेत.

डॉ. संजय गायकवाड

Back to top button