एक- दोन मंत्र्यांवरील ईडीच्या कारवाईमुळे सरकार पडणार नाही : रामदास आठवले | पुढारी

एक- दोन मंत्र्यांवरील ईडीच्या कारवाईमुळे सरकार पडणार नाही : रामदास आठवले

नगर, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडत नाही. एक-दोन मंत्र्यांवर ईडीची कारवाई झाली. म्हणजे सरकार पडेल, असे मला वाटत नाही, तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्याचा प्रश्नच नाही, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. आम्ही कोणालाही पाठीशी घालत नाही, आमचे भाजप किंवा आरपीआय पक्षातील कोणी असे काही प्रकार केले असतील, तर त्यांच्यावर कारवाई करावी, परंतु आमच्यामध्ये भानगडी करणारे कोणी नाही, असेही आठवले यांनी यावेळी सांगितले. तसेच २०२४ मध्ये केंद्रात व राज्यांमध्ये पुन्हा भाजप-आरपीआयचे सरकार येणार, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

नगर येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असता मंत्री आठवले  (Ramdas Athavale) बोलत होते. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत भालेराव, विजय वाकचौरे, अजय साळवे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे आदी उपस्थित होते. मंत्री आठवले म्हणाले की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाही. त्यांच्या मंत्र्यांवर ईडीने कारवाई केलेली आहे. पण १-२ मंत्र्यांवर कारवाई झाली म्हणजे सरकार पडेल असे नाही. परंतु शिवसेना व राष्ट्रवादी आमच्या बरोबर आले. किंवा काँग्रेसने या सरकारचा पाठिंबा काढला, तर हे सरकार पडेल, असे ते म्हणाले.

भविष्यामध्ये केजरीवालविरुद्ध मोदी असा काही संघर्ष होणार नाही. कारण मोदींच्या विरोधामध्ये केजरीवाल नव्हे, तर ममता बॅनर्जी, शरद पवार व अन्य काही नेते आहेत. त्यामुळे मोदींची लढाई सर्वाबरोबरच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजूनही विचार करून अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला मान्य करावा. व भाजपासमवेत त्यांनी पुन्हा यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या विधानाबाबत विचारले असता मंत्री आठवले म्हणाले, वास्तविक पाहता एवढ्या मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तीने सांभाळून बोलायला पाहिजे, असे मला वाटते. छत्रपती शिवाजी महाराज हे शूर होते, लढवय्ये होते, त्यांचा तसा इतिहास आहे, याचेसुद्धा दाखले इतिहासामध्ये आहेत. हे लक्षात ठेवावे. समर्थ रामदास स्वामी त्यांचे गुरू होते, या संदर्भामध्ये शिवाजीमहाराजांचा कुठलाही विषय नाही, राजमाता जिजाऊ यांनी त्यांना घडवले, असेही आठवले म्हणाले

बाळासाहेबांनी अध्यक्ष व्हावं

रिपब्लिकन ऐक्यबाबत विचारले असता मंत्री आठवले म्हणाले की, यासाठी मी अगोदरपासून प्रयत्न करत आहे, पण आता नेत्यांचे ऐक्य होणे अशक्य आहे. पण कार्यकर्त्यांसाठी एकत्रित आले पाहिजे, ही आमची सुद्धा भावना आहे. वंचित व बहुजन या शब्दांपेक्षा रिपब्लिकन या शब्दात मोठी ताकद आहे. नॉर्थ इस्ट भागात माझा पक्ष पोहोचला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व करावे. व अध्यक्षपद घ्यावं, अशी माझी इच्छा आहे. तसे त्यांनी केले तर निश्चितपणे रिपब्लिकन ऐक्याला मोठी गती मिळेल, असेही ते म्हणाले.

हेही वाचलंत ? 

पहा व्हिडिओ : चला दख्खनचा राजा जोतिबाचा महिमा ऐकूया : महिमा श्री केदारलिंगाचा…

Back to top button