बीड : आपेगाव येथे उसाच्या शेतात आढळला मानवी सांगाडा | पुढारी

बीड : आपेगाव येथे उसाच्या शेतात आढळला मानवी सांगाडा

बीड ; पुढारी वृत्‍तसेवा केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपेगाव येथे एका उसाच्या शेतात मानवी हाडांचा सांगाडा आढळला.

या विषयी अधिक माहिती अशी की, दि. १२ मार्च रोजी युसूफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आपेगाव शिवारात उसतोड सुरू हाेती. यावेळी ऊसतोड मजुरांना एक मानवी हाडांचा सांगाडा दृष्टीस पडला. त्यांनी ही माहिती युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे यांना कळविली. पोलीसांनी त्या ठिकाणी जाऊन पहाणी केली. त्याची ओळख पटविण्यासाठी नातेवाईकांना बोलावून चौकशी केला असता, त्यांच्या कपड्या वरून तो सांगाडा हा बंकट दाजी पवार यांचा असल्याचे निष्पंन्न झाले.

बंकट दाजी पवार हे २७ जानेवारी रोजी सोनिजवळा येथून बेपत्ता झाले होते. त्या बाबत दि. ३१ जानेवारी रोजी युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात त्यांची बेपत्‍ता झाल्‍याची तक्रार दाखल केली होती. त्याचा तपास पोलीस नाईक परमेश्वर शिंदे हे करीत होते. दरम्यान या आकस्माक मृत्यू प्रकरणी युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात वैद्यकीय अहवालानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात येणार आहे अशी माहिती युसूफवडगाव पोलिसांकडून देण्यात आली.

Back to top button