परभणी : जिंतूर आगारातील एसटी चालकाची आत्महत्या | पुढारी

परभणी : जिंतूर आगारातील एसटी चालकाची आत्महत्या

जिंतूर, पुढारी वृत्तसेवा : जिंतूर एसटी आगारातील एका बसचालकाने भोगाव शिवारात विहिरीत उडी मारून आत्महत्या (suicide) केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुजफ्फरखा उर्फ मुज्जुचे (वय ४०, रा. जिंतुर, आमदार कॉलनी) असे आत्महत्या केलेल्या एसटी चालकाचे नाव आहे. अद्याप एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा न निघाल्याने नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

मागील चार महिने दहा दिवसापासून एसटीचा संप सुरू आहे. कामावर नसल्यामुळे मुजफ्फरखा कर्जबाजारी झाला होता. ११ मार्च रोजी न्यायालयात सुनावणीसाठी तारीख होती.  २२ मार्च पुन्हा नवीन तारीख न्यायालयाने दिली हाेती. त्यामुळे मुजफ्फरखा निराश झाला होता.

शुक्रवारी दुपारी ४ वाजता जिंतूर बस स्थानकावरून मुजफ्फरखा निघाला व सायंकाळी भोगाव शिवारातील गोमा खिल्लारे यांच्या विहिरीवर पोहोचून विषारी द्रव्य प्राशन करून त्याने विहिरीत उडी मारली. (suicide) आज शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान मुजफ्फरखा यांचा मृतदेह आढळून आला.

मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी शहरातील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळी नातेवाईक, एसटीचे संपकरी कमर्चारी दाखल झाले होते. त्यांनी याप्रकरणी एसटी महामंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मुजफ्फरखा यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ व आईवडील असा परिवार आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या नियमानुसार प्राप्त होणारी भविष्य निर्वाह निधी, उपदान व त्यांची शिल्लक याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात येईल. तसेच राज्य महामंडळ मुजफ्फरखा यांच्या वारसदारास अनुकंपा योजनेतून त्वरित नोकरी देण्यास कार्यवाही करील. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तातडीने मिळण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे विभाग नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

पाहा व्हिडीओ :

Back to top button