सांगलीच्या मुलींचा खारकिव्ह ते हंगेरी चित्तथरारक प्रवास | पुढारी

सांगलीच्या मुलींचा खारकिव्ह ते हंगेरी चित्तथरारक प्रवास

कडेगाव, पुढारी वृत्तसेवा : रशियाकडून युक्रेन मधील खारकिव्ह आणि राजधानी असलेल्या किव्ह शहरावर तीव्र हल्ले सुरू आहेत. अशा स्थितीत आम्ही जीव मुठीत घेऊन खारकीव्हमधून बाहेर पडलो. किव्ह शहरातून रेल्वे पुढे जाईपर्यंत मनात खूप भीती होती. आकाशातून घिरट्या घालणारी विमाने आणि बॉम्बचे वर्षव सुरू होते. कानठाळ्या बसणारे आवाज ऐकून अंगाचा थरकाप उडत होता. मात्र आम्ही एकमेकांना दिलासा देत धाडसाने तो चित्तथरारक प्रवास करीत खरकीव्ह मधून सुखरुप हंगेरीत पोहचलो आहोत. असे अंगावर शहारे आणणारे कथन शिवांजली यादव हिने दैनिक पुढारीशी बोलताना व्यक्त केले.

यूक्रेनमध्ये अडकलेल्या कडेगाव तालुक्यातील कडेपुर येथील शिवांजली दत्तात्रय यादव व हिंगणगाव येथील ऐश्वर्या पाटील या दोन विद्यार्थिनीसह अन्य १५ विद्यार्थी खारकिव्ह शहरातुन धाडसाने बाहेर पडत हंगेरीमध्ये पोहचल्या आहेत. तब्बल १५५० किमी अंतराच्या रेल्वे प्रवासानंतर आता हंगेरीची राजधानी असलेल्या बुडापेस्ट या शहरात सुरक्षित पोहोचले असल्याचे त्यांनी मेसेज द्वारे आपल्या पालकांना सांगितले. लवकरच आता हे विद्यार्थी मायदेशात परतणार आहेत. त्यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कडेगाव तालुक्यातील कडेपुर येथुल शिवांजली दत्तात्रय यादव व हिंगणगाव खुर्द येथील ऐश्वर्या सुनील पाटील या दोघी एमबीबीएस शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांनी युक्रेनमधील खारकिव्ह शहरात आडकल्या होत्या . परंतु रशियाने हल्ला अधिक तीव्र केल्याने आपला जीव मुठीत घेऊन या दोन विद्यार्थिनीसह अन्य १५ भारतीय विद्यार्थ्यांनी धाडसाने खारकिव्ह शहरातून बाहेर पडल्या असून आता त्या हंगेरीत पोहचल्या आहेत. हंगेरीच्या राजधानी असलेल्या बुडापेस्ट शहरात आता हे विद्यार्थी सुखरूप आहेत. यावेळी शिवांजली यादव म्हणाली, खारकिव्ह येथून मंगळवारी सकाळी मधून जीव मुठीत घेऊन आम्ही बाहेर पडलो. खारकिव्ह मधून रेल्वेने प्रवास करीत असताना युक्रेनची राजधानी असलेल्या किव्ह पासून पुढे जाई पर्यंत भीतीचे वातावरण होते.

मात्र आम्ही एकमेकांना दिलासा देत धाडसाने तो चित्तथरारक प्रवास करीत होतो. मंगळवारी सायंकाळी लिव्ह रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचल्यावर तेथे उतरून या काही तास पुढील रेल्वेची प्रतीक्षा करीत होतो. लिव्ह मध्येही हल्ले सुरू होते त्यामुळे भीती कायम होती. तेथून काही वेळाने दुसऱ्या रेल्वेने युक्रेनमधील चॉप शहरात पोहोचल्यावर आम्हला मोफत जेवण व पाणी आदी सुविधा मिळाल्या. त्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला. बुधवारी रात्री तेथून हंगेरीच्या बुडापेस्टकडे जाणाऱ्या रेल्वेने युक्रेनमधील चॉप शहरापासून २४५ किमी अंतरावर हंगेरी बॉर्डरवर रेल्वे पोहचल्यावरच आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला. लवकरच आम्ही आमच्या भारत देशात पोहचणार आहोत याची आम्हाला उत्सुकता लागली आहे. आई ,बाबा सह कुटुंबियांना आम्ही खूप मिस करत असल्याचे शिवांजली यादव व ऐश्वर्या पाटील यांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button