CJI N. V. Ramana : पुतीन यांना युद्ध थांबविण्यासाठी आम्ही निर्देश देऊ का?; सरन्यायाधीश रमणा यांची टिप्पणी | पुढारी

CJI N. V. Ramana : पुतीन यांना युद्ध थांबविण्यासाठी आम्ही निर्देश देऊ का?; सरन्यायाधीश रमणा यांची टिप्पणी

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे, अशा स्थितीत सरकारला कोणतेही निर्देश दिले जाऊ शकत नाहीत, असे सांगतानाच रशियाचे राष्ट्रपती ब्लादीमिर पुतीन यांना आम्ही युद्ध थांबविण्यासाठी निर्देश देऊ का? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी गुरुवारी केली. (CJI N. V. Ramana)

विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्याबाबत सरकारला आदेश द्यावेत, अशा विनंतीच्या याचिकेवर सुनावणी करताना रमणा यांनी ही टिप्पणी केली. रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यानच्या युद्धाला आठ दिवस पूर्ण झाले असून अजूनही असंख्य विद्यार्थी तिथे अडकलेले आहेत, असा दावा याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला होता.

आम्ही विद्यार्थ्यांच्या बरोबर आहोत, अडकलेल्या विद्यार्थ्यांबद्दल आम्हालाही वाईट वाटत आहे, पण पुतीन यांना युद्ध थांबविण्याचे आदेश आपण देऊ शकत नाही. विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी कोणकोणते उपाय योजले जात आहेत, याची विचारणा ऍटर्नी जनरलना केली जाईल, असेही रमणा यांनी नमूद केले. (CJI N. V. Ramana)

याचिकाकर्ता युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारी विद्यार्थिनी आहे. ती ज्या ठिकाणी आहे, तेथे 250 विद्यार्थी फसलेले आहेत. रोमानियाच्या सीमेद्वारे त्यांना बाहेर काढण्यात आलेले नाही, असे याचिकाकर्त्याच्या वकिलाकडून सांगण्यात आले.

यावर ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन राष्ट्रपती पुतीन यांच्याशी चर्चा केलेली आहे. एका मंत्र्याला रोमानियाला पाठविण्यात आले आहे. सरकार सर्व ते प्रयत्न करत आहे.

Back to top button