कॅसिनो, रेस्टॉरंट, हॉटेल, शाळांना मुभा, शंभर टक्के उपस्थितीस मान्यता | पुढारी

कॅसिनो, रेस्टॉरंट, हॉटेल, शाळांना मुभा, शंभर टक्के उपस्थितीस मान्यता

पणजी : पुढारी वृत्तसेवा ;गोवा राज्यातील कॅसिनो, रेस्टॉरंट, हॉटेल व शाळा शंभर टक्के उपस्थितीत सुरू करण्यास कोरोना नियंत्रण तज्ज्ञ समितीने मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव सरकारला पाठवण्यात येत आहे, अशी माहिती तज्ज्ञ समितीचे सदस्य डॉ. शेखर साळकर यांनी दिली.

राज्य सरकारने स्थापन केलेल्या कोरोना नियंत्रण तज्ज्ञ समितीचे प्रमुख व गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) चे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी, दि. 28 रोजी डॉ. बांदेकर यांच्या कार्यालयामध्ये तज्ज्ञ समितीची बैठक झाली. डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले की, आज झालेल्या तज्ज्ञ समितीच्या बैठकीत राज्यामध्ये कोरोना नियंत्रणात येत असल्यामुळे सर्व आर्थिक व्यवहार 100 टक्के क्षमतेने सुरू व्हावेत, असे ठरवले आहे.

यामध्ये कॅसिनो, रेस्टॉरंट, हॉटेल इतर व्यवसाय या सर्वांमध्ये पूर्वी जशी उपस्थिती असायची तशी 100 टक्के उपस्थिती असावी. मात्र, प्रत्येकाने मास्कचा वापर करावा आणि सदर ठिकाणांचे सॅनिटायझेशन करावे. असेही त्यामध्ये सूचित केले आहे. सध्या हे व्यवसाय 50 टक्के उपस्थितीत सुरू आहेत. राज्यातील शाळा सध्या 50 टक्के उपस्थितीत सुरू आहेत. कारण केंद्रीय कोरोना नियमावलीचा तो भाग आहे . मात्र राज्य तज्ञ समितीने राज्यातील शाळा सुद्धा शंभर टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे.मात्र विद्यार्थ्यांना मास्कचा वापर करण्यास लावणे आणि शाळांचे वारंवार सॅनिटायजेशन करणे गरजेचे सांगितले आहे.

सीमेवरून गोव्यामध्ये येणार्‍या लोकांना दोन डोस असलेल्यांना थेट प्रवेश द्यावा,असेही तज्ञ समितीने सुचवले आहे . व्यायाम शाळांमध्ये मास्कचा वापर शक्य नसल्यामुळे थोड्या दूरवर राहून व्यायाम करावा, असेही आजच्या बैठकीमध्ये सूचित करण्यात आल्याचे डॉ. साळकर यांनी सांगितले.

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत असलेल्या सुपर स्पेशालिटी इस्पितळात एकही रुग्ण नाही. फक्त गोमेकॉमध्ये पाच रुग्ण असल्याचे डॉ. साळकर यांनी सांगितले. तिसर्‍या लाटेमध्ये जे कोरोना बाधित मृत्यू पावले ते ओमायक्रॉन की डेल्टा यामुळे मृत्यू पावले ,त्याची तपासणी सुरू आहे.

31 मार्चपर्यंत आपत्कालीन कायदा ठेवून त्यानंतर तो मागे घेतला जाऊ शकतो. पर्यटन हंगाम सुरू झाला असल्यामुळे राज्यांमध्ये विमाने येत आहेत. आणि विमान प्रवाशांचीसुद्धा आता फक्त दोन टक्केच तपासणी होत असल्याचे सांगून राज्यात कोरोना पूर्णपणे नियंत्रणात येत असल्याचे डॉ. साळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

अमेरिकेचे पथक लवकरच येणार

ओमायक्रॉन व डेल्टा विषाणूंची तपासणी करण्यासाठीचे यंत्र अमेरिकेतून गोव्यामध्ये दाखल झालेले आहे. बैठकीमध्ये या यंत्राबाबतही चर्चा झाली.हे यंत्र हाताळण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी अमेरिकेवरून येणारे पथक अद्याप आले नसल्यामुळे यंत्र कार्यान्वित होण्यासाठी आणखी दहा ते बारा दिवस लागणार आहेत, असे डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button