खटाव : पुढारी वृत्तसेवा
मला माझ्या मतदारसंघाचा विकास करायची, पाणीयोजना पूर्ण करायची मस्ती आहेच. मी माणचे नव्हे तर शरद पवारांचे राजकारण नासवलंय, हे जिल्ह्याला माहीत आहे. पवारांचा सच्चा सैनिक म्हणवणारे प्रभाकर देशमुख मला भाजपात घ्या, म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या हातापाया पडत होते. पवारांनी कायम सहकार्य केलेले देशमुख निवृत्तीनंतर पवारांचाच कार्यक्रम करायला निघाले होते, असा गौप्यस्फोट आ. जयकुमार यांनी केला. दरम्यान, जनतेला लुबाडून भ्रष्टाचाराने गोळा केलेली त्यांची संपत्ती लवकरच रडारवर येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
विरळी येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आ. गोपीचंद पडळकर, भाजप तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, धनाजी जाधव, सिध्दार्थ गुंडगे, साखरे, बाळासाहेब माने, धर्मदेव पुकळे, सरपंच प्रशांत गोरड, बबनराव काळे, गावोगावचे सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते उपस्थित होते. आ. गोरे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत देशमुखांनी कधी नव्हे ते जातीपातीचे राजकारण केले. पैशाच्या जीवावर 88 हजार मते घेतली. मात्र, कोरोना काळात ते कुलूपबंद होते. ते गायब असल्याची बोंबाबोंब सुरु झाल्यावर शेवटी शेवटी विविध कंपन्यांकडून पैसे आणायचे नाटक करताना त्यातही भ्रष्टाचार केला. देशमुखांच्या उसालाही मी आणलेले उरमोडीचे पाणी मिळते. मी मतदारसंघात आल्यावरच पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना सुरू झाली. साखळी सिमेंट बंधारे माझ्याच काळात झालेत, त्यामुळे जयकुमारचे नाव घ्यायचीही देशमुखांची लायकी नाही. मी त्यांच्यासारखा लुटारू रावण नाही. माण खटावच्या जनतेचा मी सेवक आहे.
या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवायला मला पुन्हा आमदार व्हायचे आहे, त्यासाठी तुमच्यासारख्या बाजारबुणग्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. नोकरीत असताना त्यांनी कुणालाही नोकरीला लावले नाही. सीओ असताना एमआयडीसीसाठी काही केले नाही. मी आधी पाणी आणले आणि नंतर एमआयडीसी मंजूर करुन घेतली. फाटलेल्या आभाळाला टाके घालायचे काम मी गेली 12 वर्षे करतोय. 143 कोटींच्या निधीतून शेतकर्यांच्या बांधापर्यंत पाणी नेण्याची कामे सुरू आहेत. मतदारसंघातील सर्व भागात पाणी नेल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असेही आ. गोरे म्हणाले. माणमध्ये 24 पैकी 18 सोसायट्या आमच्या ताब्यात आहेत.पण, आम्ही मस्ती केली नाही. देशमुख मात्र थोड्या सोसायट्या ताब्यात येताच हुरळून गेले आहेत. नोकरीत असताना त्यांना पगार किती होता, त्यांच्याकडे किती संपत्ती आहे? याची लवकरच चौकशी होणार आहे. त्यांच्याकडील माल बघून त्यांचीच पार्टी त्यांना सोडत नाही, जनताही तुम्हाला सोडणार नाही. लवकरच जिहेकठापूर योजनेच्या पाण्याने अंघोळ घालून त्यांचे शुध्दीकरण करावे लागणार, असा टोलाही आ. गोरेंनी लगावला.
आ. गोपीचंद पडळकर म्हणाले, आ. जयाभाऊ देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. त्यांनी जिहेकठापूरसाठी मोठ्या निधीची तरतूद केली आहे. आ. गोरे यांच्या रूपाने दुष्काळी भागाचा आवाज विधानसभेत यापुढेही बुलंद राहणे गरजेचे आहे. त्यांचे विरोधक भ्रष्टाचारी आहेत. त्यांच्याकडे हजारो कोटींची संपत्ती कुठून आली? याची चौकशी होवून ते नक्कीच जेलमध्ये जाणार आहेत.
प्रास्तविक जाधव गुरुजींनी केले. शिवाजीराव शिंदे, सरपंच प्रशांत गोरड यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात जलदूत, कोरोना योद्ध्ये आणि सोसायटीच्या नूतन संचालकांचा गौरव करण्यात आला. यावेळी धनाजी कदम, नरळे, अमर गोरड, हेमंत नलावडे, आप्पासाहेब आटपडकर, सोपानराव गोरड उपस्थित होते.
सेटलमेंट करत नाही, छाताडावर बसून पुढे जातो
माझी औलाद तुमच्यासारखी सेटलमेंट करणारी नाही. छाताडावर बसून मी पुढे जातो. जिल्हा बँक निवडणुकीत 3 जागा मिळत होत्या. पण, डाग लागायला नको म्हणून घेतल्या नाहीत. बँकेत मनोज पोळांचा पराभव देशमुखांमुळेच झाला असेही आ. गोरेंनी सांगितले.