महाशिवरात्रोत्सव : त्र्यंबकनगरीत बम बम भोलेचा गजर ; मंदिर रात्रभर खुले राहणार | पुढारी

महाशिवरात्रोत्सव : त्र्यंबकनगरीत बम बम भोलेचा गजर ; मंदिर रात्रभर खुले राहणार

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान महाशिवरात्रोत्सवासाठी सज्ज झाले असून आज मंगळवारी (दि. 1) महाशिवरात्रोत्सव होत आहे. पेशवेकालीन परंपरेने साजर्‍या होत असलेल्या या उत्सवासाठी देशभरातून भाविक त्र्यंबकनगरीत दाखल झाले आहेत. पहाटे पासूनच दर्शनासाठी येथे रांगा लागल्या आहेत.

त्र्यंबकेश्वर मंदिर वर्षभरात केवळ याच उत्सवात रात्रभर दर्शनासाठी खुले असते. मध्यरात्री मंदिरातून निघणारी पालखी पाच आळीमार्गे पूर्वसंस्थानिक जोगळेकर यांच्या पेशवेकालीन वाडा असलेल्या निवासस्थानाच्या मार्गावरून कुशावर्त येथे जाईल. दरम्यान, त्र्यंबकेश्वर मंदिरास विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनातर्फे कोविड च्या अनुषंगाने ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेले निर्बंध सध्या अस्तित्वात असल्याने गर्भगृह दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, पूर्वपरंपरेने श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे मंदिर मंगळवारी (दि. 1) सकाळी 6 पासून बुधवारी(दि. 2) रात्री 9 पर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे. मंदिर दररोज पहाटे 5 ते रात्री 9 पर्यंत खुले असण्याचा नियम आहे. मात्र, केवळ महाशिवरात्रीलाच रात्रभर मंदिर खुले राहते. गेल्या वर्षी कोरोनामुळे भाविकांना दर्शन घेता आले नव्हते. मात्र, यंदा मंदिर रात्रभर खुले राहणार आहे. तसेच रात्री 11 वाजता होणारा पालखी सोहळा अनुभवता येणार आहे. दुपारी 3 वाजता मंदिरातून पाच आळीमार्गे कुशावर्तावर पालखी जाईल.

तीन दिवस कार्यक्रम
श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात कथक नृत्य, भक्तिसंध्या असे विविध कार्यक्रम होतील. यात प्रसिद्ध कलाश्री संगीत गुरुकुलचे विद्यार्थी व त्यांचे सहकारी यांचा ‘स्वरयात्रा’ हा सुरेल कार्यक्रम व पंडित जसराज यांचे शिष्य पंडित प्रसाद दुसाने यांचा ‘शिवस्तुती’ हा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

दर अर्ध्या तासाने त्र्यंबकला बसेस

शिवरात्रीनिमित्त आज मंगळवारी (दि. 1) त्र्यंबक येथे होणारी गर्दी लक्षात घेता महापालिकेच्या सिटीलिंक शहर बससेवेतर्फे नाशिकरोड आणि निमाणी बसस्थानक येथून त्र्यंबक येथे जाण्यासाठी अनुक्रमे दर अर्ध्या तासाने व 15 मिनिटांनी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

नाशिकरोड येथून दर अर्ध्या तासाला, तर पंचवटीतील निमाणी बसस्थानकातून दर 15 मिनिटांनी त्र्यंबक येथे जाण्याकरिता बसेस सोडल्या जाणार आहेत. निमाणी येथून मंगळवारी (दि. 1) सकाळी सहा वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत तसेच नाशिकरोड येथून पहाटे पाच वाजेपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत बसेस सोडण्यात येणार आहेत. भाविकांनी या बस फेर्‍यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक महानगर परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक नितीन बंड यांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button