‘गंगुबाई काठियावाडी’ पाहून भावुक झाल्या वारांगणा ; नाशिकमध्ये काळ्याफिती लावून निषेध | पुढारी

‘गंगुबाई काठियावाडी’ पाहून भावुक झाल्या वारांगणा ; नाशिकमध्ये काळ्याफिती लावून निषेध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जगण्यासाठीच्या संघर्षातून नशिबी आलेले वारांगणाचे जीवन… वारांगणा म्हणून जगताना समाजाकडून होणारी अवहेलना व होणारा अन्याय असे प्रसंग दररोजचे… गंगुबाई काठियावाडी चित्रपटामधून वारांगणांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. नाशिकमधील 60 वारांगणा हा चित्रपट पाहून भावुक झाल्या. त्याचवेळी या महिलांनी एकजूट करत आपल्यावर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्याचा निर्धारही केला.

देहविक्रय करणार्‍या महिलांसाठी कार्य करणार्‍या प्रवरा मेडिकल ट्रस्टतर्फे शहरातील 60 वारांगणांना सोमवारी (दि.28) सिडकोतील सिनेमागृहात गंगुबाई काठियावाडी चित्रपट दाखविण्यात आला. येत्या बुधवारी (दि.3) असलेल्या जागतिक सेक्स वर्कर्स राइट्स डे आणि 8 मार्चच्या महिलादिनाच्या निमित्ताने हा चित्रपट दाखविण्यात आला.

1960 च्या दशकात वारांगणांकडे बघण्याच्या समाजाच्या मानसिकतेवर आधारित हा चित्रपट असला तरी आजही त्यात बदल झालेला नाही. देहविक्रय व्यवसाय पूर्ण कायदेशीर असला तरी वस्त्या मात्र कायदेशीर नाहीत. परिणामी, समाजाच्या भीतीपोटी आजही अशा महिलांना वस्ती सोडावी लागत असल्याने त्यांना आव्हानांना तोंड द्यावे लागते. तसेच पदोपदी अवहेलनादेखील सोसावी लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर चित्रपट पाहताना वारांगणांनी आपल्यावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध हाताला काळ्याफिती लावत निषेध नोंदविला.

गंगुबाई कोण बनणार?
गंगुबाई काठियावाडी चित्रपट बघितल्यानंतर उपस्थित वारांगणांमध्ये केवळ एकच चर्चा रंगली. ती म्हणजे आपल्यापैकी गंगुबाई कोण बनणार? आणि त्यांच्या पाठीशी उभा राहणार डॉन रौफ लाला आणि पत्रकार रिजी त्यांना कधी भेटणार? परंतु, या सर्व विचाराच्या चक्रात अडकलेल्या वारांगणांनी सरतेशेवटी एकजुटीने आपल्यावरील अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा निर्धार केला अन् गंगुबाई प्रत्येकीत निर्माण होण्याची जिद्द दाखवली.

हेही वाचा :

Back to top button