LPG cylinder prices : गॅस सिलिंडर महागला! दरात १०५ रुपयांची वाढ | पुढारी

LPG cylinder prices : गॅस सिलिंडर महागला! दरात १०५ रुपयांची वाढ

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

जागतिक बाजारात इंधनाचे दर वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडर दरात (Commercial LPG cylinder prices) 105 रुपयांची वाढ केली आहे. 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर आता 2012 रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे पाच किलो वजनाच्या गॅस सिलिंडरचे दर देखील 27 रुपयांनी वाढून 569 रुपयांवर गेले आहेत. तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरचे दर मात्र जैसे थे ठेवले आहेत.

जागतिक बाजारातील चढ-उतारानुसार दर महिन्याच्या 1 तारखेला गॅस सिलिंडर दरात बदल केले जातात. त्यानुसार मंगळवारी व्यावसायिक गॅस सिलिंडर दरात (Commercial LPG cylinder prices) वाढ करण्यात आली आहे. ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीत 19 किलो वजनाच्या गॅस सिलिंडरचे दर 1907 रुपयांवरून 2012 रुपये इतके झाले आहेत. कोलकाता येथे हेच दर 1987 वरून 2095 रुपयांवर तर मुंबईत 1857 रुपयांवरून 1963 रुपयांवर गेले आहेत.

विशेष म्हणजे गत महिन्यात 1 फेब्रुवारीला व्यावसायिक गॅस सिलिंडर दरात 91.50 रुपयांची कपात करण्यात आली होती. दरम्यान, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : कसे झाले रशियाचं विघटन ? सांगतायत परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक रोहन चौधरी

Back to top button