परभणी : जिंतुर तालुक्यातील वस्सा गावात ग्रामस्थांनी अखंड हरिनाम सप्ताहात केलं गरीब मुलीचे लग्‍न | पुढारी

परभणी : जिंतुर तालुक्यातील वस्सा गावात ग्रामस्थांनी अखंड हरिनाम सप्ताहात केलं गरीब मुलीचे लग्‍न

जिंतुर (जि. परभणी), पुढारी वृत्‍तसेवा : जिंतुर तालुक्यातील वस्सा गावातील गरीब मुलीच्या लग्नासाठी, ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन अखंड हरिनाम सप्ताहातच मुलीचे थाटामाटात लग्न करुन दिले आहे. हे लग्‍न वस्सा येथिल सिद्धेश्वर महाराज मठात करून दिले.

वस्सा येथील मीराबाई व भगवान घाडगे यांच्या मोठया मुलीचे नाव राणी आहे. भगवान घाडगे मोल मजुरी करुन आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. यांना तीन मुले व दोन मुली आहेत. तसेच त्‍यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अशा या बिकट परिस्थितीत मुलीचे लग्न कसे करायचे  हा माेठा प्रश्न त्‍याच्यासमाेर निर्माण झाला होता.

यावेळी गावातील नागरिकांनी पुढाकार घेऊन राणी करीता शिरपूर जैन (जिल्हा वाशिम) येथील इलेक्ट्रेशियन मदन देशमुख या युवकासोबत गावात सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात सर्वांनी मिळून यांचा विवाह पार पाडला.

सप्ताहातील ‘रुख्मिणी स्वंयवराचा’ मुहूर्त साधून दुपारी 3.30 च्या सुमारास राणी आणि गजानन यांचे लग्न गावकऱ्यांनी थाटामाटात केले. गावकऱ्यांनी आपल्या घरातील मंगलकार्य समजून यात योगदान दिले हे विशेष. वस्सेकरांच्या सामाजिक दात्रृत्वामुळे एका गरीबाच्या मुलीचे लग्न थाटामाटात पार पडले. या विवाह सोहळ्याने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. या वस्सेकरांच्या समाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हे ही वाचलं का  

Back to top button