परभणी : गर्भवतीने भर पुरात थर्माकोल तराफ्यातून ओलांडली नदी | पुढारी

परभणी : गर्भवतीने भर पुरात थर्माकोल तराफ्यातून ओलांडली नदी

मानवत (परभणी) : डॉ. सुहास चिद्रवार प्रसूतीसाठी माहेरी आलेल्या गर्भवतीला भर पुरातून तेही थर्माकोलच्या तराफ्यातून प्रवास करावा लागल्याची थरारक घटना परभणी जिल्ह्यात बुधवारी घडली. जीवघेण्या प्रसववेदना आणि पुराच्या पाण्याची भीती अशा भयंकर मानसिक अवस्थेत या गर्भवतीने नदी पार केली. या स्थितीतही ती रुग्णालयात वेळेत पोहोचल्याने तिची प्रसूती सुखरूप झाली. बाळ आणि बाळंतीण सुखरूप आहे. तालुक्यातील टाकळी नीलवर्ण येथे बुधवारी ही घटना घडली.

बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील शिवकन्या अंगद लिंबुर्ते ही 22 वर्षीय गर्भवती बाळंतपणासाठी माहेरी परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातील टाकळी नीलवर्ण (जि. परभणी) येथे आली होती. दोन-तीन दिवसांपासून तिच्या पोटात दुखू लागले होते.ॉ

परंतु, दुधना नदीला पूर आल्याने वाहतुकीचे सर्वच मार्ग बंद झाले आहेत. साहजिकच, तिला घेऊन नदी ओलांडून जाणे तिच्या कुटुंबाला शक्य झाले नाही.

पुलावरून पाणी वाहत असल्याने गावाचा जगाशी संपर्क तुटला होता. डॉक्टरांनाही गावात येणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत तिला प्रसववेदना सुरू झाल्या, अस्वस्थ वाटू लागले, अशातच तिची प्रकृती बिघडू नये म्हणून भाऊ उमेश उत्तम कटारे, राहुल उत्तम कटारे यांनी अन्य दोन नातेवाईक महिलांसह तिला बुधवारी सकाळी 7 च्या सुमारास नदीकाठावर आणले.

थर्माकोलचा तराफा करण्यात आला आणि नाइलाजाने तिला या तराफ्यावर बसवले. सर्वांच्याच मनात धाकधूक सुरू झाली. मात्र, या अवस्थेतही थरारक प्रवास करीत त्यांनी सुखरूपपणे नदी ओलांडली. तिला मानवत ग्रामीण दवाखान्यात सकाळी 9 च्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेण्यात आले.

मदतीसाठी धावलेल्या युवकांवर अभिनंदनाचा वर्षाव

टायर ट्यूब, थर्माकोल आणि इतर वस्तूंच्या आधाराने बनवलेला तराफा या गर्भवतीसाठी आधार ठरला. हा तराफा करून महिलेचा व बाळाचा जीव वाचवणार्‍या युवकांचे अभिनंदन होत आहे. मोठ्या धाडसी पद्धतीने नदी पार करण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो पाहतानाही थरकाप उडतो.

Back to top button